जुन्या सचिवालयात उभारणार गोवा राज्य वस्तुसंग्रहालय

ओल्ड गोव्यात नवीन वस्तुसंग्रहालयाची स्वतंत्र इमारत

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
9 hours ago
जुन्या सचिवालयात उभारणार गोवा राज्य वस्तुसंग्रहालय

पणजी : गोवा राज्य वस्तुसंग्रहालयाला अखेर कायमस्वरूपी आणि पूर्ण क्षमतेने कार्यरत होण्यासाठी पणजीतील ऐतिहासिक आदिलशहा राजवाडा (जुने सचिवालय) येथे स्थान मिळणार आहे. २०२३ मध्ये गोवा सरकारने आदिलशहा राजवाड्याची संपूर्ण इमारत गोवा राज्य वस्तुसंग्रहालयासाठी देण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती संग्रहालयाचे संचालक डॉ. वासू उसपकर यांनी दिली.
यासोबतच ओल्ड गोवा येथील याला फार्म परिसरात ३,६०० चौरस मीटर क्षेत्रफळावर गोवा राज्य वस्तू संग्रहालयासाठी स्वतंत्र व भव्य इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीचे आराखडे तयार असून, लवकरच बांधकामाला सुरुवात होणार आहे. नवीन इमारत पूर्ण झाल्यानंतर तिला ‘गोवा स्टेट म्युझियम’, तर पणजीतील जुन्या सचिवालयातील संग्रहालयाला ‘गोवा आर्ट म्युझियम’ असे नामकरण करण्यात येणार असल्याचे डॉ. उसपकर यांनी सांगितले.
पूर्वी पाटो–पणजी येथील इमारतीत कार्यरत असलेले गोवा राज्य वस्तू संग्रहालय २०१७ मध्ये इमारत असुरक्षित ठरल्याने आदिलशहा राजवाड्यात स्थलांतरित करण्यात आले. त्यानंतर तेथून मर्यादित स्वरूपात उपक्रम व कामकाज सुरू होते. २०२३ पर्यंत आदिलशहा राजवाड्यात कला अकादमी आणि स्मार्ट सिटीची कार्यालये कार्यरत होती. अलीकडे ही दोन्ही कार्यालये हलविण्यात आल्याने संग्रहालयासाठी संपूर्ण इमारत उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या ऐतिहासिक इमारतीच्या नूतनीकरणास विविध कारणांमुळे विलंब झाला होता. मात्र, काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) आदिलशहा राजवाड्याच्या नूतनीकरणासाठी अधिकृत निविदा प्रसिद्ध केल्याने कामाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नूतनीकरणानंतर इमारतीचे सौंदर्यीकरण करण्यात येणार असून, त्यानंतर गोवा राज्य वस्तू संग्रहालय ‘फुल फ्लॅश’ म्हणजेच संपूर्ण क्षमतेने कार्यरत होईल, असा विश्वास डॉ. उसपकर यांनी व्यक्त केला.
सध्या गोवा राज्य वस्तू संग्रहालयाकडे १० हजारांहून अधिक ऐतिहासिक व सांस्कृतिक ठेवा उपलब्ध आहे. यामध्ये प्राचीन मूर्ती, चित्रे, नाणी, टपाल तिकिटे, शिल्पे, पुरातन वस्तू तसेच विविध स्मारकांशी संबंधित साहित्य यांचा समावेश आहे. योग्य जागा आणि आधुनिक संरचनेअभावी हा अमूल्य ठेवा आजपर्यंत जनतेसमोर पूर्णपणे मांडता आला नव्हता, असेही डॉ. वासू उसपकर यांनी नमूद केले.