तत्कालीन पंचायत संचालकांकडून अनेक नोटिसींना स्थगिती

‘बर्च’ दुर्घटनेनंतर कारवाई संयुक्त अंमलबजावणी समितीकडून हणजूणमधील दियाज क्लब सील


4 hours ago
तत्कालीन पंचायत संचालकांकडून अनेक नोटिसींना स्थगिती

हणजूणमधील दियाज क्लबला सील ठोकण्याची कारवाई करताना अधिकारी.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : फक्त रोमिओ लेनच्या क्लबनाच नव्हे तर अन्य अनेक प्रकरणांत पंचायतींच्या नोटींसींना तत्कालीन पंचायत संचालक सिद्धी हळर्णकर यांनी स्थगिती दिल्याची माहिती मिळाली आहे. रविवारी हणजूण येथील सील केलेल्या दियाज क्लबचे बांधकाम पाडण्याच्या नोटिसीलाही पाच महिन्यांपूर्वी त्यांनीच स्थगिती दिली होती.
हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन नाईट क्लबमधील भीषण आगीच्या दुर्घटनेनंतर राज्य सरकारने नियमांचे उल्लंघन करणार्‍या नाईट क्लबांविरोधात मोहीम उघडली आहे. यासाठी अंमलबजावणी समितीची नेमणूक करण्यात आली आहे. बार्देश तालुक्यातील किनारी भागातील क्लबची तपासणी करण्यासाठी ही खास समिती नियुक्त केली आहे.
शनिवार, १३ रोजी या समितीने प्रसिद्ध असलेल्या दियाज क्लबची पाहणी केली होती. तेव्हा या क्लबकडे अग्निशमन दलाचा ‘ना हरकत’ दाखला होता; मात्र या एनओसीनुसार क्लबमध्ये आवश्यक अग्निसुरक्षा व्यवस्था नव्हती. हा प्रकार उघडकीस आल्यावर शनिवारीच अग्निशमन दलाने आपली एनओसी मागे घेतली होती. त्यामुळे हा क्लब चालवण्यासाठी क्लबच्या व्यवस्थापनाकडे अग्निशमन दलाची परवानगी नसल्याने वरील समितीने रविवारी सायंकाळी हा क्लब सील करण्यात आला.
वरिष्ठ नागरी अधिकारी कबीर शिरगावकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक निखिल पालेकर, अग्निशमन दलाचे स्टेशन अधिकारी सुशील मोरजकर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता आशिष राजपूत व इतरांच्या समिती पथकाने ही कारवाई केली. यापूर्वी या समितीने वागातोर येथील ‘गोया’ व ‘कॅफे सीओ-२’ हे प्रसिद्ध नाईट क्लब सील केले आहेत.
अतिक्रमण हटाव नोटिसीवर निर्णय नाहीच
हणजूण- कायसूव पंचायतीने दियाज क्लबला बेकायदा बांधकाम प्रकरणी अतिक्रमण हटाव नोटीस बजावली होती. ही नोटीस ४ जुलै २०२५ रोजी जारी करण्यात आली होती.
पंचायतीच्या नोटिसीला क्लब व्यवस्थापनाने पंचायत संचालनालयासमोर आव्हान दिले. त्यावर पंचायत संचालनालयाने एक्स पार्टी (एकतर्फी) सुनावणी घेत डिमोलिशन नोटिसीला स्थगिती दिली होती. बर्च दुर्घटनेप्रकरणी निलंबित व तत्कालीन पंचायत संचालक सिद्धी हळर्णकर यांनी हा स्थगितीचा आदेश जारी केला होता.
स्थगिती आदेश काढून टाकावा, यासाठी पंचायतीने पंचायत संचालनालयाकडे अर्ज केला असता या अर्जावर ९ डिसेंबर रोजी सुनावणी झाली.
पंचायत संचालकांनी पुढील सुनावणीपर्यंत ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचे निर्देश दिले.
ही सुनावणी आता १८ डिसेंबर रोजी होणार आहे.

चौकशी पूर्ण झाली नसल्याने अहवालाला होणार विलंब

हडफडे येथील बर्च क्लब दुर्घटनेप्रकरणी अधिकारी व संबंधितांची चौकशी सुरू आहे. चौकशी पूर्ण झाली नसल्याने चौकशी अहवाल सादर होण्याला विलंब होईल. दुर्घटनेची चौकशी करणाऱ्या दंडाधिकाऱ्यांच्या समितीला सरकारने एका आठवड्याची मुदत दिली आहे. समितीने हडफडेचे सरपंच रोशन रेडकर, जमिनीचे मूळ मालक प्रदीप घाडी आमोणकर आणि सुनील दिवकर यांची चौकशी केली आहे. कागदपत्रे, परवान्यांची तपासणी आणि संबंधितांची चौकशी सुरू आहे, अशी माहिती दंडाधिकारी अंकित यादव यांनी दिली. निलंबित झालेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तत्कालीन सदस्य सचिव शमिला मोंतेरो यांची चौकशी झाली आहे. परवाने देणाऱ्या अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेणे सुरू आहे. ती प्रक्रिया झाल्यानंतर अहवाल सादर केला जाईल, असे दंडाधिकारी अंकित यादव यांनी सांगितले. बर्च क्लबला मागील शनिवारी रात्री आग लागून २५ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेला ८‌ दिवस पूर्ण झाले आहेत.