कुठ्ठाळी उड्डाणपुलावरील अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

भरधाव वेग नडला; दोघेही मूळचे आसामचे


5 hours ago
कुठ्ठाळी उड्डाणपुलावरील अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

प्रतिनिधी। गोवन वार्ता
वास्को : कुठ्ठाळीच्या उड्डाणपुलावर रविवारी मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास झालेल्या अपघातात कोन्सुआ कुठ्ठाळी येथे राहणारे के. एच. बिक्रम सिनघा (२१) व ए. परिटोन सिनघा (२३) या दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वेर्णा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे आसामचे आणि सध्या कामानिमित्त कोन्सुआ कुठ्ठाळी येथे राहणारे के. एच. बिक्रम व ए. परिटोन हे रविवारी मध्यरात्री सव्वा एकच्या दरम्यान मोटारसायकलीने पणजीहून वेर्णाकडे चालले होते. के. एच. ब्रिकम मोटारसायकल चालवत होता. भरधाव वेगाने मोटारसायकल चालवत असताना कुठ्ठाळी उड्डाणपुलावर त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला. त्यामुळे दुचाकी रस्ता दुभाजकाला धडक देऊन रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेली. त्याचवेळी वेर्णाहून पणजीकडे निघालेल्या एका स्कोडा कारला त्या दुचाकीची धडक बसली. त्यामुळे रस्त्यावर ते दोघेही दुचाकीसह आपटले. गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याने त्यांना त्वरित उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघातप्रकरणी वेर्णा पोलिसांनी पंचनामा केला. याप्रकरणी पोलीस निरीक्षक आनंद शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक प्रमिला फर्नांडिस पुढील तपास करत आहेत.