अनेकांना नोटिसा : पंचायत संचालनालयाची काहींना स्थगिती

काब द राम येथील ‘दि केप गोवा’ हॉटेलवर कारवाई करण्यासाठी पोलिसांसोबत पोहोचलेले अधिकारी.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : बर्च क्लबमधील अग्नितांडवानंतर राज्यात बेकायदा बांधकामांविषयी चर्चा सुरू झाली आहे. पंचायतींनी बेकायदा बांधकामे पाडण्याचे आदेश देऊनही पंचायत संचालनालयाने दिलेल्या स्थगितीमुळे अनेक कारवाया रखडल्या आहेत. पंचायतींनी शोधलेली बेकायदा बांधकामे बार्देश तालुक्यात सर्वाधिक आहेत. राज्यातील सर्व पंचायतींनी मिळून एकूण ३,३०४ बेकायदा बांधकामे शोधली आहेत. त्यापैकी निम्म्याहून अधिक म्हणजे १,७३० बांधकामे बार्देशमध्ये आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
हडफडे येथील बर्च क्लबला मागील शनिवारी लागलेल्या आगीत २५ जणांनी जीव गमावला होता. या दुर्घटनेचा तपास दंडाधिकारी समितीमार्फत सुरू आहे. आगीत खाक झालेल्या बर्च क्लबचे बांधकाम बेकायदेशीर होते. बनावट करारपत्र सादर करून बर्चच्या मालकांनी विविध परवाने मिळवल्याचे उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने बेकायदा क्लब व पर्यटनाशी संबंधित आस्थापनांवर कारवाई सुरू केली आहे. त्यासाठी तालुकास्तरावर समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत दियाज (हणजूण), सीओ २ (वागातोर) हे क्लब सील केले आहेत. बांधकामे पाडण्याच्या आदेशाला तत्कालीन पंचायत संचालकांनी स्थगिती दिल्याने ती पाडणे शक्य झाले नाही. आता असे क्लब सील करण्याची कारवाई सरकारने स्थापन केलेल्या समितीने सुरू केली आहे. सोमवारी काब द राम येथे शॅकएेवजी हॉटेल उभारल्याबद्दल ‘दी कॅप गोवा’ या हॉटेलला सील ठोकण्यात आले.
बेकायदेशीर बांधकामांचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया पंचायत स्तरावर सुरूच असते. पंचायत राज कायद्याखाली बेकायदेशीर बांधकामांविरोधात कारवाई करण्याचे अधिकार पंचायतींना आहेत. बेकायदेशीर बांधकाम पाडण्याची नोटीस पंचायतीने जारी केल्यानंतर त्या नोटिसीला पंचायत संचालनालयाकडे आव्हान दिले जात होते. पंचायत संचालनालयाने स्थगिती दिली तर पंचायतीला कारवाई करता येत नाही. उत्तर गोव्यात २,१७९ तर दक्षिण गोव्यात १,०४९ बेकायदेशीर बांधकामांविषयीची सुनावणी पंचायत संचालनालयाकडे प्रलंबित आहे. काही नोटिसींना स्थगिती दिली आहे, तर काही बांधकामांविषयी सुनावणी सुरू आहे.
पंचायतींनी शोधलेल्या ३,३०४ बांधकामांपैकी बार्देश तालुक्यातील पंचायतींमध्ये १,७३० बेकायदेशीर बांधकामे आहेत. हे प्रमाण सुमारे ५२ टक्के होते. यानंतर फोंडा तालुक्यात ७१२, तिसवाडीत ३२५, सासष्टीत २९०, काणकोणमध्ये ६९, पेडण्यात ६०, डिचोली तालुक्यात ५८, मुरगावात ३४, सत्तरीत १७, सांगे तालुक्यात ५, तर धारबांदोडा तालुक्यात ४ बेकायदेशीर बांधकामांचा समावेश आहे. केपे तालुक्यातील पंचायतींनी बेकायदा बांधकामांचा शोध घेतलेला नाही. पंचायती तक्रारी येतील तशा पंचायत सचिवांमार्फत पाहणी करून तपासणी करतात. पंचायतीने मंजुरी दिल्यानंतर नोटीस पाठवली जाते. बस्तोडा, कळंगुट, पोंबुर्पा, साल्वादोर द मुंद, गिरी, कांदोळी, आसगाव या बार्देश तालुक्यातील पंचायतींमध्ये बेकायदेशीर बांधकामांचे प्रमाण अधिक आहे.
बर्चला परवाने सिद्धी हळर्णकर यांच्याच काळात
बर्च क्लबकडे आवश्यक परवाने नव्हते. अग्निशमन यंत्रणा आवश्यक त्या क्षमतेची नव्हती. त्यामुळे सरकारने तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. निलंबित केलेल्या सिद्धी हळर्णकर बराच काळ पंचायत संचालक होत्या. बर्च क्लबला परवाने त्यांच्याच कार्यकाळात मिळाले होते. तसेच ‘दियाज’, ‘सीओ २’ या क्लबनाही पंचायतीने जारी केलेल्या डिमोलिशन आदेशाला त्यांच्याच कार्यकाळात स्थगिती मिळाली होती.