पर्यावरणप्रेमींसह गोमंतकीयांचे लक्ष

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : व्याघ्रक्षेत्र करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या गोवा सरकारच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीच्या यादीत या आव्हान याचिकेचा समावेश आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या तज्ज्ञ समितीने (सीईसी) ४६८.८० चौ.कि.मी. व्याघ्रक्षेत्र जाहीर करण्याची शिफारस केली आहे. यामध्ये नेत्रावळी आणि खोतीगाव अभयारण्य मिळून २९६.७० चौ.कि.मी.चे क्षेत्र आहे. याशिवाय भगवान महावीर (उत्तर भाग) आणि भगवान महावीर पार्क मिळून १७१.९० चौ.कि.मी.चे बफर क्षेत्र असेल. व्याघ्रक्षेत्र अधिसूचित करण्याची प्रक्रिया तीन महिन्यांत सुरू करावी, असे अहवालात स्पष्ट केले आहे. या अहवालानंतर याचिकेवर सोमवारी सुनावणी होईल. काणकोणचे आमदार तथा मंत्री रमेश तवडकर, सांगेचे आमदार तथा मंत्री सुभाष फळदेसाई, सभापती गणेश गावकर यांचा प्रस्तावित व्याघ्रक्षेत्राला विरोध आहे.
तज्ज्ञ समितीने दिला न्यायालयाला अहवाल
म्हादईसह खोतीगाव, नेत्रावळी, भगवान महावीर अभयारण्य व्याघ्रक्षेत्र करण्याचा प्रस्ताव आहे. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने ही शिफारस केली आहे. त्याला गोवा सरकारचा विरोध आहे. व्याघ्रक्षेत्र अधिसूचित करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर गोवा सरकारने त्याला सर्वोच्च न्यायालयान आव्हान दिले. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी तज्ज्ञ समिती (सीईसी) स्थापन केली होती. समितीने न्यायालयात अहवाल सादर केला आहे.