पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका

पणजी : जिल्हा पंचायत वांगडी येथील कार्तिक कुडणेकर आणि संजना वेळीप यांच्यासह एकूण १० जणांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाचे सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी या हकालपट्टीचे आदेश जारी केले आहेत.
हकालपट्टी करण्यात आलेल्यांमध्ये शिवा चोडणकर, भावना नाईक, संजय वेळीप, अतिश गावकर, सुधा गावकर, विपीन प्रभुगावकर, अच्युत प्रकाश नाईक आणि राजेश शेट्टी यांचाही समावेश आहे.
जिल्हा पंचायत निवडणुकीत पक्षाची अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने काहींनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी दाखल केली, तर काहींनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध काम केल्याचे निष्पन्न झाले आहे. या संदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेऊनच पक्षाने ही शिस्तभंगाची कारवाई केल्याचे सरचिटणीस कुंकळ्येकर यांनी स्पष्ट केले. पक्षशिस्तीचे उल्लंघन आणि पक्षविरोधी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशाराही भाजपकडून देण्यात आला आहे.