
मडगाव : बाणावली येथील तळेबांध तळ्यात बुडून दीड वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. घराबाहेरील परिसरात खेळत असताना हे दीड वर्षीय बालक अचानक तळ्यातील पाण्यात पडले.
मिळालेल्या माहितीनुसार, तळेबांध, बाणावली येथे राहणाऱ्या घरातील दीड वर्षीय बालक इरहान शेख याचा तळ्यात बुडाल्याने मृत्यू झाला. सोमवारी दुपारी साडेअकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घराच्या नजीक खेळत असताना इरहान तळेबांध तळ्याच्या पाण्यात पडला. पाण्यात पडल्यामुळे त्याच्या नाकातोंडात पाणी गेले.
घटनेची माहिती मिळताच उपस्थितांनी त्याला तत्काळ पाण्यातून बाहेर काढून उपचारासाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर बालकाला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच कोलवा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी इस्पितळाच्या शवागारात ठेवण्यात आला असून, पोलीस निरीक्षक विक्रम नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.