अज्ञाताने लावलेल्या आगीत शेतकऱ्याच्या कष्टांची राखरांगोळी

खानापूर-गर्बेनहट्टी येथे भाताच्या गंजी जाळल्याने लाखोंचे नुकसान

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
2 hours ago
अज्ञाताने लावलेल्या आगीत शेतकऱ्याच्या कष्टांची राखरांगोळी

शेतकरी निवृत्ती पाटील यांच्या जळून खाक झालेल्या गवताच्या गंजी.

जोयडा : खानापूर (Khanapur) तालुक्यातील गर्बेनहट्टी (Garbenhatti) येथे एका अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत शेतकऱ्याच्या वर्षभराच्या कष्टांची राख रांगोळी करण्यात आल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. मळणीसाठी रचून ठेवलेल्या भाताच्या सहा गंजी आणि शेजारील शेतकऱ्याचे चार ट्रॅक्टर गवत एका रात्रीत जळून खाक झाले. या घटनेमुळे शेतकरी कुटुंबांवर मोठे संकट कोसळले असून, अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
निवृत्ती नामदेव पाटील (Nivritti Namdev Patil) या शेतकऱ्याने आपल्या शेतात कापणी केलेले भात पीक मळणीसाठी व्यवस्थित सहा गंजी (वळी) करून ठेवले होते. मात्र, रविवार (दि.१४) रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञाताने लावलेल्या आगीत या सर्व गंजी पूर्णपणे जळून खाक झाल्या. अंदाजे ८० ते १०० पोती भात या आगीत नष्ट झाले आहे. सोमवारी (दि.१५) सकाळी शेतात पोहोचताच राखेचे ढीग पाहून शेतकरी व त्यांच्या पत्नीचा आक्रोश काळजाला चिरणारा होता.
या दुर्दैवी आगीचा फटका शेजारील शेतकरी कुमार परशराम पाटील यांनाही बसला आहे. त्यांच्या शेतात साठवलेले सुमारे चार ट्रॅक्टर गवत देखील या आगीत पूर्णपणे जळून गेले आहे. आधीच अडचणीत असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हा आणखी एक असह्य आघात ठरला आहे.
सदर घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली, तोपर्यंत भाताच्या गंजी आणि गवत पूर्णपणे भस्मसात झाले होते. घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी घटनास्थळी जमा झाले, मात्र हातात उरली ती फक्त राख आणि वेदना.
सूडबुद्धीने आग लावल्याचा तीव्र संशय
घटनास्थळी कोणत्याही प्रकारच्या वीजवाहिन्या किंवा विद्युत तारा नसल्याने, शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याची शक्यता नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही आग कोणीतरी जाणीवपूर्वक, वाईट व सूडबुद्धीने लावल्याचा तीव्र संशय परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
तातडीच्या मदतीची मागणी
या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महसूल व कृषी खात्याने तातडीने घटनास्थळी येऊन पंचनामा करावा आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. तसेच आग लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा तातडीने शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

हेही वाचा