
पणजी : गोवा विद्यापीठाची (Goa University) विद्यार्थी मंडळाची (Student Council) निवडणूक (Election) अचानक रद्द केल्या कारणाने गोवा विद्यापीठात तणाव निर्माण झाला. एनएसयुआय (NSUI)आणि अभाविप (ABVP) या दोनही विद्यार्थी संघटनांनी याचा निषेध करून गोवा विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागापुढे मोर्चा धरला. एनएसयुआयच्या विजयाला घाबरून ही निवडणूक रद्द केल्याचा आरोप एनएसयुआयने केला आहे.
मंगळवारी सकाळी १०.३० वाजता गोवा विद्यापीठाची कार्यकारी विद्यार्थी परिषद निवडणूक होणार होती. मात्र, झेडपी निवडणुकीच्या आचार संहितेचे कारण देत गोवा विद्यापीठाने ही निवडणूक रद्द केली. या निर्णयामुळे मतदान करण्यासाठी आलेले विद्यार्थी निराश झाले व नंतर वाद निर्माण झाला.
गोवा विद्यापीठाची निवडणूक मतदान सुरू होण्याच्या १५ मिनिटांपूर्वी अचानक रद्द केली. या निवडणुकीची सर्व प्रक्रिया म्हणजे उमेदवारी अर्ज, चाचपणी होऊनही निवडणूक रद्द करण्याचा निर्णय घेतला, असा आरोप एनएसयुआयचे अध्यक्ष नौशाद चौधरी यांनी केला.
ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजप आणि अभाविप यांच्याकडे कमी मते होती; त्या कारणाने ही निवडणूक रद्द केली असावी. आमचा विजय या निवडणुकीत निश्चित होता. जर ही निवडणूक पुढे ढकळण्यात आली तरी, आमचा विजय होणार याची आम्हाला खात्री आहे. ही निवडणूक रद्द करण्याच्या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात आव्हान देणार, असा इशारा चौधरी यांनी दिला.
निवडणुकीसाठी पेडणे ते काणकोण पर्यंतचे कार्यकर्ते आमच्या कार्यालयात एकत्र झाले व मतदानासाठी विद्यापीठात पोचले. तेव्हा निवडणूक पुढे ढकळल्याची नोटीस पाहून आम्हाला धक्का बसला; असे अभाविपचे उत्तर गोवा सहसंयोजक अंशूल सिनारी यांनी सांगितले.
आम्ही विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाला प्रश्न विचारला. ही निवडणूक झेडपी निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुढे ढकळल्याचे कारण त्यांनी दिले. झेडपी निवडणूक आचारसंहीता आहे हे आम्ही मान्य करतो. मात्र, आचारसंहीता अंमलात आहे; याची जाणिव गोवा विद्यापीठाला आहे. मात्र, ऐन वेळी निवडणूक रद्द करण्याच्या निर्णयाचा आम्ही निषेध करतो; असे सिनारी म्हणाले.
आमचे गोवाभरातील ५५ पेक्षा जास्त युवक मतदान करण्यासाठी आले होते. आज निवडणूक झाली असती तर अभाविपचा विजय १०० टक्के निश्चित होता. मात्र, निवडणूक पुढे ढकळली आहे त्याची लवकरात लवकर नवी तारीख जाहीर करावी आणि निवडणूक लोकशाही मार्गाने प्रक्रिया करावी, अशी मागणी सिनारी यांनी केली.