सकाळी साडे दहापर्यंत पोहचतील गोव्यात

पणजी : हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ क्लबला लागलेल्या भीषण आग प्रकरणातील मुख्य संशयित गौरव आणि सौरभ लुथरा या मालक बंधूंना घेऊन गोवा पोलिसांचे पथक बुधवारी सकाळी दिल्लीहून विमानाने गोव्यासाठी रवाना झाले आहे. साडेदहा वाजेपर्यंत हे दोन्ही संशयित गोव्यात पोहोचतील, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक नीलेश राणे यांनी दिल्लीत विमानतळावर पत्रकारांना दिली आहे. २५ जणांचा बळी घेणाऱ्या या भीषण दुर्घटनेनंतर हे दोघेही देश सोडून पळून गेले होते, मात्र १० दिवसांच्या आंतरराष्ट्रीय शोध मोहिमेनंतर त्यांना अटक करण्यात यश आले आहे.
६ डिसेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास क्लबमध्ये कार्यक्रम सुरू असताना कोल्ड पायरोमुळे छताला आग लागली होती. या दुर्घटनेनंतर ७ डिसेंबर रोजी पहाटेच लुथरा बंधू भारतातून थायलंडला पसार झाले होते. भारत सरकारने त्यांचे पासपोर्ट रद्द केल्यानंतर आणि 'लुकआऊट' नोटीस जारी केल्यानंतर, थायलंडमधील भारतीय दूतावासाने त्यांना आपत्कालीन प्रवास कागदपत्रे जारी केली. त्यानंतर थायलंड सरकारने त्यांना भारतात हद्दपार (Deport) केले. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचताच गोवा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

दिल्लीतील पतियाळा हाऊस न्यायालयाने मंगळवारी संध्याकाळी लुथरा बंधूंना दोन दिवसांची ट्रान्झिट रिमांड मंजूर केली. वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना गोव्यात आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. गोव्यात पोहोचल्यानंतर त्यांना म्हापसा येथील न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाणार आहे. गोवा पोलिसांनी त्यांच्यावर सदोष मनुष्यवधासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले असून, यापूर्वी त्यांचे अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले होते.
या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी अजय गुप्ता, राजीव मोडक, प्रियांशू ठाकूर, राजवीर सिंघानिया, विवेक सिंग आणि भारत कोहली या इतर सहकाऱ्यांना अटक केली आहे. आग लागली तेव्हा क्लबमध्ये १५० हून अधिक पर्यटक उपस्थित होते. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून लुथरा बंधूंच्या अटकेमुळे आता अनेक धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.