आयएएस अधिकाऱ्याची गाडी तपासली; वरिष्ठांनी दिली 'उठाबशांची' शिक्षा'

गोव्यातील संतापजनक प्रकार.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
आयएएस अधिकाऱ्याची गाडी तपासली; वरिष्ठांनी दिली 'उठाबशांची' शिक्षा'

पणजी : गोव्यात कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांसोबत अत्यंत संतापजनक आणि मानहानीकारक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. सांता क्रुझ परिसरात नियमित नाका तपासणी दरम्यान उपस्थित असलेल्या राखीव दलाच्या जवानाने एका आयएएस अधिकाऱ्याची कार थांबवून तपासणी केली. दरम्यान ही बाब समजल्यानंतर उत्तर गोव्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना चक्क उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. या प्रकारामुळे पोलीस दलात तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी सांता क्रुझ भागात नेहमीप्रमाणे वाहनांची तपासणी करत होते. यावेळी त्यांनी एका कारला थांबवून तपासणी सुरू केली. संबंधित आयएएस अधिकाऱ्याने आपली ओळख सांगितल्यानंतरही जुने गोवे पोलीस स्थानकाशी संलग्न असलेल्या आयआरबी जवानाने आपली प्रक्रिया सुरूच ठेवली. मात्र, ही बाब संबंधित अधिकाऱ्याच्या प्रतिष्ठेला लागली आणि त्यांनी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांकडे याबद्दल तक्रार केली. त्या आयपीएस अधिकाऱ्याने उत्तर गोव्याच्या पोलीस अधीक्षकांना एकंदरीत घटनेची कल्पना दिली. यानंतर उत्तर गोवा पोलीस आधीक्षकांनी संबंधित आयआरबी जवानाला पर्वरी येथील कार्यालयात बोलावून घेतले आणि त्याला शिस्तभंगाच्या नावाखाली सर्वांसमोर उठाबशा काढायला लावल्या.

नियमांचे पालन करणाऱ्या आणि आपले कर्तव्य चोख बजावणाऱ्या पोलिसांना सन्मान देण्याऐवजी, अशा प्रकारे जाहीर अपमान केल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस महासंचालक अलोक कुमार यांनी तात्काळ हस्तक्षेप केला आहे. पोलीस महासंचालकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेला हा आदेश पूर्णपणे अयोग्य आणि नियमबाह्य असल्याचे स्पष्ट केले आहे. शिस्तीच्या नावाखाली कर्मचाऱ्यांचा असा अपमान करणे चुकीचे असून, जर पोलिसांनी कर्तव्यावर असताना नियमांचे पालन केले असेल, तर त्यांच्यावर कोणतीही कारवाई होऊ नये, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच नियमित तपासणी दरम्यान तैनात पोलीस कर्मचाऱ्यांनी निर्धारित प्रोटोकॉलचे काटेकोर पालन करावे असेही म्हटले आहे.  

या घटनेमुळे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची मानसिकता आणि पोलीस दलातील अंतर्गत शिस्त यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना जर अशा प्रकारे वागणूक मिळाली, तर त्यांच्या मनोबलावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


हेही वाचा