‘द केप गोवा’च्या बेकायदा बांधकामावर कारवाई व्हावी

उपजिल्हाधिकार्‍यांचे जीसीझेडएमए, प्रदूषण, पर्यटन खात्याला पत्र

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
27 mins ago
‘द केप गोवा’च्या बेकायदा बांधकामावर कारवाई व्हावी

मडगाव : गोवा सरकारने (Goa Government) स्थापन केलेल्या संयुक्त अंमलबाजवणी व देखरेख पथकाच्या निर्देशानंतर विविध नियमांचे उल्लंघनप्रकरणी काणकोणातील (Canacona) ‘द केप गोवा’ (The Cape Goa Restaurant) रिसॉर्ट सील केला. दक्षिण गोवा उपजिल्हाधिकार्‍यांनी जीसीझेडएमए, प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यटन संचालनालयाला पत्र पाठवून या रिसॉर्टची तत्काळ पाहणी करुन कारवाई करण्याची मागणी केली आहे.

काणकोणातील काब द राम किनार्‍यानजीक डोंगरकापणी करून उभारण्यात आलेल्या द केप गोवा या रिसॉर्टवर संयुक्त अंमलबजावणी व देखरेख समितीच्या अहवालात अनेक प्रकारची उल्लंघने आढळून आली. यात सीआरझेड क्षेत्रात डोंगरकापणी करणे, स्ट्रक्चरल स्टेबिलिटी प्रमाणपत्र नसणे, ऑक्युपन्सी प्रमाणपत्र, पंचायतीची परवानगी यातील काहीही नाही. 2022 मध्ये अस्थायी स्वरुपाचे  शॅक्स उभारणीसाठी पर्यटन खात्याने दिलेल्या परवान्याच्या आधारावर हे रेस्टॉरंट उभारण्यात आले.

हे रिसॉर्ट सील करण्यात आल्यानंतर आता दक्षिण गोवा उपजिल्हाधिकारी (महसूल) रोहन लोलयेकर यांनी अंमलबजावणी समितीच्या अहवालासह रिसॉर्ट बंद करण्यात आला असून; सीआरझेड व पर्यावरणीय कायद्याचे उल्लंघन असल्याने सदर बेकायदा बांधकाम पाडणे, जागा पूर्ववत करणे व पर्यावरणीय नुकसानीची भरपाईबाबत अहवालात नमूद आहे. यानुसार गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथोरिटीच्या सदस्य सचिवांना पत्र पाठवण्यात आले आहे.

तसेच गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवांना पत्र पाठवून समितीने दिलेल्या अहवालानुसार पर्यावरण कायद्याच्या उल्लंघनासाठी कारवाई करण्यास सांगण्यात आले. पर्यटन खात्याच्या संचालकांना पत्र पाठवून पर्यटन खात्याच्या जागेतील सदर आस्थापनाची पाहणी करण्यात यावी व बेकायदा बांधकामांवर कायद्यानुसार कारवाई करावी, असे सूचित करण्यात आले. 

हेही वाचा