
पणजी : टोरोंटो (Toronto) येथे झालेल्या दक्षिण आशियाई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (South Asia International Cinema Festival) आंतरराष्ट्रीय पातळीवर दोन पुरस्कार प्राप्त ‘आसेसांव’ या कोंकणी चित्रपटाला उद्या १९ डिसेंबर पासून सुरू होत असलेल्या हैद्राबाद आंतरराष्ट्रीय लघुपट चित्रपट महोत्सवात उद्घाटक सिनेमा म्हणून आमंत्रीत केले आहे. गोवा मुक्ती दिनी सुरू होत असलेल्या तीन दिवसांचा महोत्सव तेलंगण (Telangana) सरकारच्या तेलंगण चित्रपट विकास महामंडळाच्या सौजन्याने दादासाहेब फाळके स्कूल ऑफ फिल्म स्टडीस आयोजित करते.
या महोत्सवात आंतरराष्ट्रीय किर्तीचे जगभरातील लघुपट तसेच भारताच्या प्रादेशीक भाषांतील लघुपट प्रदर्शीत करण्यात येणार आहेत. तीन दिवसांच्या या महोत्सवात स्पर्धात्मक, बिगर स्पर्धात्मक, उत्तर पू्र्व पॅव्हॅलियन आणि संस्कृती व पुरावलोकन लघुपटांचा समावेश असणार. यावर्षीच्या महोत्सवात अमेरिका आणि युरोप सहीत जगभरातील ७०४ अर्ज आले आहेत.
या आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पडदा ‘आसेवांव’ या चित्रपटाने उघडावा यासाठी आयोजकांनी दिग्दर्शक मंगिरीश बांदोडकर यांना आमंत्रित केले आहे. टोरोंटोतल्या दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवात ‘आसेसांव’ला उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्राप्त झाला होता. तसेच टोरोंटोमध्येच उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार पटकावलेल्या प्रशांती तळपणकर यासुद्धा या हैद्राबाद येथील महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत.
वृद्धापकाळ व एकटेपणाला तोंड देताना येणारी आव्हाने यांचे चित्रण संवेदनशील पद्धतीने या लघुपटात करण्यात आले आहे. तसेच या चित्रपटात प्रमुख वृद्ध महिलेची भूमिका केलेल्या कलाकाराने हा चित्रपट एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला असे हैद्राबाद महोत्सवात आमंत्रित करण्यामागचा उद्देश स्पष्ट करताना आयोजिकांनी सांगितले.
भारतातले एक उत्कृष्ट चरित्र अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून मान्यता मिळालेले नसीर हे या महोत्सवाच्या परीक्षक मंडळाचे अध्यक्ष आहेत. तसेच ‘इक्बाल’ फेम लेखक व दिग्दर्शक नागेश कुकुनूर, सिने समीक्षक आणि साहित्यीक मैथिली राव, राष्ट्रीय पुरस्कार विजयी उत्पल बोरपुजारी, पटकथा लेखक, दिग्दर्शक आणि संपादक बिप्लब गोस्वामी आणि सिक्किमचे सिने दिग्दर्शक अभिषेक चेत्री यांचाही या परीक्षक मंडळात समावेश आहे.