गोवा : ‘मॅपिंग’ न झालेल्या मतदारांची संख्या वास्को, दाबोळीत अधिक

निवडणूक आयोग २० डिसेंबरपर्यंत पाठवणार नोटीस

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
55 mins ago
गोवा : ‘मॅपिंग’ न झालेल्या मतदारांची संख्या वास्को, दाबोळीत अधिक

पणजी : राज्यातील मतदारांची विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर SIR) पूर्ण झाल्यानंतर एकूण १ लाख ८२ हजार ४०३ मतदारांचे ‘मॅपिंग’ झालेले नाही. यात उत्तर गोव्यातील ७३ हजार २३५, तर दक्षिण गोव्यातील १ लाख ९ हजार १६८ मतदारांचा समावेश आहे. अशा मतदारांचे अथवा त्यांच्या आई-वडिलांचे नाव २००२ च्या मतदार यादीत नाही. वास्को मतदारसंघात १२ हजार ९५१, तर दाबोळीतील ११ हजार २०१ मतदारांचे मॅपिंग झालेले नाही.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दाबोळीनंतर कुठ्ठाळीतील १० हजार ७७६, नावेलीतील ७,९८५, मडगावमधील ७,७८९, फातोर्डातील ७,३२६, कुडतरीतील ६,१८५, फोंडातील ६,०२५, पर्वरीतील ५,९५२, मुरगावातील ५,९२६, ताळगावतील ५,२२१, थिवीतील ५,१७४, म्हापशातील ५१५७, सांताक्रूझमधील ५,०९९, कळंगुटमधील ४,८११, साळगावातील ४,८०६ , हळदोणेतील ४,७४२ मतदार ‘मॅप’ झालेले नाहीत.

निवडणूक आयोगाने मॅपिंग न झालेल्या सर्व मतदारांची नावेदेखील मसुदा मतदार यादीत समाविष्ट केली आहेत. असे असले तरी याबाबत सुनावणी घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. या मतदारांना निवडणूक आयोगाकडून २० डिसेंबरपर्यंत नोटीस पाठविण्यात येईल. नोटीसवर सुनावणीची वेळ, तारीख आणि ठिकाण नमूद केले जाईल. मॅप न झालेल्या मतदारांना आपण भारतीय नागरिक असल्याचे सिद्ध करावे लागेल. यासाठी त्यांना आवश्यक कागदपत्रे द्यावी लागतील.


मांद्रेत मॅपिंग न झालेल्या मतदारांची संख्या कमी

मांद्रे मतदारसंघात मॅपिंग न झालेल्या मतदारांची संख्या कमी आहे. येथे १,३३० मतदारांचे मॅपिंग झालेले नाही. यानंतर सांगेमध्ये १,४२४, पेडणेमध्ये १,९३३, सावर्डेमध्ये २,११२, नुवेमध्ये २,१३६, बाणावलीमध्ये २,१५८, तर सांत आंद्रे मतदारसंघातील २,३४० मतदारांचे मॅपिंग झालेले नाही.       

हेही वाचा