दारूच्या नशेत आईच्या खूनप्रकरणी पुत्र सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली दोषी

२०१९ मध्ये केला होता खून : सबळ पुराव्यामुळे ठरला दोषी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
51 mins ago
दारूच्या नशेत आईच्या खूनप्रकरणी पुत्र सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली दोषी

पणजी : मेरशी येथे २०१९ मध्ये रागाच्या भरात आणि दारूच्या नशेत आई लक्ष्मीबाई (६९) हिला मारहाण करण्यात आली होती. त्यात तिचे निधन झाले होते. या प्रकरणी मेरशी येथील सत्र न्यायालयाने पुत्र संदीप वेर्लेकर याला सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली दोषी ठरविले आहे. याबाबतचा आदेश न्या. ईर्शाद आगा यांनी दिला.

या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी १९ नोव्हेंबर २०१९ रोजी गुन्हा दाखल केला. त्यानुसार, आरोपी संदीप वेर्लेकर हा १८ नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान दारु पिऊन घरी आला. त्यानंतर त्याने आजारी आई लक्ष्मीबाई (६९) हिला मारहाण केली. त्यावेळी इतर कुटुंबातील सदस्यांनी तिला आरोपीच्या तावडीतून सुटका केली होती. त्यानंतर रात्री ९ वाजता आरोपीची आई घरात झोपली होती. त्यावेळी आरोपीने तिला मारहाण करत व्हरांड्यात आणून ठेवले होते. त्याचवेळी तिने आरडाओरडा केल्यानंतर घरातील इतर सदस्य धावत बाहेर आले. यावेळी संदीप तिथेच होता. त्यानंतर तिला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

या प्रकरणी न्यायालयाने प्रथमदर्शनी पुराव्याची दखल घेऊन २४ सप्टेंबर २०२१ रोजी आरोप निश्चित करून खटला सुरू केला. या प्रकरणी न्यायालयात सरकारी अभियोक्ता अनुराधा तळावलीकर आणि राॅय डिसोझा यांनी बाजू मांडली. या प्रकरणी न्यायालयाने सबळ पुराव्यांची दखल घेऊन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्यामुळे आरोपी संदीप वेर्लेकर याला सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली दोषी ठरविले आहे.

शवचिकित्सा अहवालानंतर खुनाचा गुन्हा दाखल

शवचिकित्सा अहवाल आल्यानंतर पोलिसांनी आरोपी संदीप वेर्लेकर याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली. तपास पूर्ण झाल्यानंतर २५ फेब्रुवारी २०२५ रोजी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. 

हेही वाचा