१५ दिवसांत राज्यात २४८ आपत्कालीन कॉल्स

२८ जणांचा मृत्यू; ६.८० कोटींचे नुकसान, ६१.६१ कोटींची मालमत्ता वाचवली

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
14th December, 11:36 pm
१५ दिवसांत राज्यात २४८ आपत्कालीन कॉल्स

पणजी : राज्यातील अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाने २८ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर या १५ दिवसांचा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, या कालावधीत अग्निशमन दलाला राज्यभरातून एकूण २४८ आपत्कालीन कॉल्स प्राप्त झाले.

यापैकी १६ आग लागण्याच्या घटना व ५ आपत्कालीन मदत घटनांचा समावेश असलेल्या एकूण २१ प्रमुख आपत्कालीन घटना नोंदवण्यात आल्या. या घटनांमध्ये २ गंभीर व १ मोठी घटना होती. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, सुमारे १०.६२ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, तत्पर अग्निशमन कारवाईमुळे अंदाजे २१ लाख रुपयांची मालमत्ता वाचवण्यात यश आले आहे.

याशिवाय, विविध अपघातांमध्ये ५ जनावरांचा मृत्यू झाला असून, ४४ जणांचे प्राण वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

दरम्यान, शुक्रवारी वेर्णा औद्योगिक वसाहतीतील एका भंगार अड्ड्याला लागलेली आग विझवण्यासाठी मडगाव, पणजी व वास्को येथून २५ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

या १५ दिवसांच्या कालावधीत घडलेल्या विविध घटनांमधून सुमारे ६.८० कोटी रुपयांचे नुकसान झाले असून, जलद आणि प्रभावी कारवाईमुळे ६१.६१ कोटी रुपयांची मालमत्ता वाचवण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले आहे.

हडफडेतील घटनेत २५ जणांचा मृत्यू

२८ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत राज्यात ८ गंभीर व ३३ मोठ्या घटना घडल्या. या घटनांमधून एकूण २८ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यामध्ये हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ क्लबला लागलेल्या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेल्या २५ जणांचा समावेश आहे. उर्वरित ३ मृत्यू इतर आपत्कालीन अपघातांमध्ये झाल्याची नोंद आहे. 

हेही वाचा