गुन्हा शाखेच्या सायबर विभागाची कारवाई : बायंगिणी-जुने गोवा येथून ७ जणांना अटक

पणजी : बायंगिणी-जुने गोवा येथून अमेरिकन नागरिकांना कर्ज व इतर सुविधा देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या बनावट काॅल सेंटरचा गुन्हा शाखेच्या सायबर विभागाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी सायबर विभागाने छापा टाकून हिमांशू सिंग चौहान (२८, वडोदरा - गुजरात) याच्यासह इतर सहा जणांना अटक केली. त्याच्याकडून विभागाने ६ लाख किमतीचे ६ लॅपटाॅप, ४ मोबाईल व इतर साहित्य जप्त केले.
सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बायंगिणी - जुने गोवा परिसरातील एका बंगल्यात काही संशयास्पद कारवाया होत असून तिथे अनेक युवक राहत असल्याची माहिती गुप्तहेरांकडून मिळाली होती. त्यानुसार, गुप्तहेरांनी दिलेल्या माहितीची चौकशी केली असता, त्या ठिकाणी बनावट काॅल सेंटर सुरू असल्याची माहिती मिळाली. अधीक्षक राहुल गुप्ता आणि साहाय्यक अधीक्षक बी. व्ही. श्रीदेवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक नवीन नाईक, हवालदार योगेश खांडेपारकर, कॉ. करोल ईब्राहिम, अक्षय वेर्लेकर, आशिष नाईक, ग्रतेश मडकईकर या पथकाने गुरुवार, ११ रोजी रात्री संबंधित बंगल्यावर छापा टाकला. पथकाने हिमांशू सिंग चौहान (२८, वडोदरा - गुजरात), अविशेक चौधरी (२७, कल्याणी - पश्चिम बंगाल), बासुदेव चक्रवर्ती (२७, बिझपूर -पश्चिम बंगाल), मोहसिन हुसेन मन्सुरी (३६, अहमदाबाद - गुजरात), स्वयम पांडे (२०, रामनगर- झारखंड), सय्यद साकिब उद्दीन (३९, हजारीबाग - झारखंड आणि विलास उतेकर (२४, मालाड पश्चिम, मुंबई-महाराष्ट्र) या सात जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विभागाने ६ लाख रुपये किमतीचे ६ लॅपटाॅप, ४ मोबाईल व इतर साहित्य जप्त केले.
या प्रकरणी निरीक्षक दीपक पेडणेकर यांनी संबंधितांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१९(२) आर डब्ल्यू ३(५) आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६६डी अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.
विविध आमिषे दाखवत फसवणूक
सायबर विभागाने संशयितांची चौकशी केली असता, वरील टोळी बनावट काॅल सेंटर मार्फत “Payday” या कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवून अमेरिकन नागरिकांशी संपर्क साधत होते. त्यांना कर्ज आणि इन्स्टंट मनी देण्याचे आमिष दाखवत होते. त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट कार्ड खरेदी करायला लावून फसवणूक करायचे असे समोर आले आहे.