पाजीफोंड येथे घरफोडी : पाच लाखांचा मुद्देमाल लंपास

मडगाव : पाजीफोंड येथील बंद घरात चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. खिडकीची ग्रील काढून चोरांनी घरात प्रवेश करत रोख रकमेसह सुवर्णालंकार असा सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल चोरी केला. चोरांनी घरातील फ्रिजमधील पदार्थ खाल्ले तसेच मद्यही प्यायल्याचे सामाजिक कार्यकर्त्या आवढा व्हिएगस यांनी सांगितले. याप्रकरणी फातोर्डा पोलीस पुढील तपास करीत आहेत.
पाजीफोंड येथील बंद घरात चोरी झाल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. पाजीफोंड येथील ओलांड काब्राल यांच्या घरातील किचनच्या खिडकीची ग्रील काढून चोरांनी घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाट, लाकडी कपाट खोलून चोरांनी घरातील साहित्य चोरी केले. काब्राल यांच्या घरात कुणीही राहत नाहीत. काब्राल पती व पत्नी दोघेही वृद्धाश्रमात राहतात. शनिवार, दि. ६ डिसेंबर रोजी काब्राल यांनी घराकडे येऊन पाहणी केली होती, त्यावेळी चोरी झाल्याचे दिसून आले नव्हते. शनिवारी रात्री ते रविवार सकाळपर्यंतच्या कालावधीत ही चोरीची घटना घडली. काब्राल घरात आल्यानंतर घरातील बारचा दरवाजा उघडा दिसला. त्यानंतर किचनमधील ग्रील खाली काढून ठेवल्याचे दिसले. यानंतर त्यांनी फातोर्डा पोलिसांना चोरी झाल्याची माहिती दिली.
सामाजिक कार्यकर्त्या आवढा व्हिएगस यांनी चोरीबाबत माहिती देताना सांंगितले की, चोरांनी घरातील कपाटातील अँटीक पीससह सुवर्णालंकार व ५० हजारांची रोख रक्कम चोरी केली. याशिवाय घरातील फ्रिजमधील खाद्यपदार्थ खाल्ले व मद्याच्या बाटल्याही रिकामी केल्या आहेत. सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल चोरी झाल्याचे त्यांनी सांगितले. फातोर्डा पोलिसांनी घटनास्थळी जात पाहणी केली आहे.
पोलिसांनी गस्त वाढविण्याची गरज
मडगावातील बंद घराला चोरांनी लक्ष्य केलेले आहे. पोलिसांनी गस्त वाढविण्याची गरज आहे. ज्येष्ठ नागरिक राहत नसल्याचे पाहून ही चोरी झाली. काब्राल दाम्पत्य घरात आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे समजले, असे सामाजिक कार्यकर्त्या आवढा व्हिएगस यांनी चोरीबाबत माहिती देताना सांगितले.