अजय गुप्ता होता आयपीएस, स्थानिक पोलिसांच्या संपर्कात

बर्च क्लब दुर्घटना : घटनेनंतर सकाळी केले होते दिल्लीला पलायन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
47 mins ago
अजय गुप्ता होता आयपीएस, स्थानिक पोलिसांच्या संपर्कात

पणजी : हडफडे येथील बर्च क्लबची घटना घडली तेव्हा रोमिओ लेनचे सहमालक संशयित अजय गुप्ता हा गोव्यात होता. सकाळी तो विमानमार्गे दिल्लीला गेला. या दुर्घटनेवेळी तो एका वरिष्ठ आयपीएस अधिकारी तसेच स्थानिक पोलिसांच्या संपर्कात होता. त्यामुळे हे दोघेही अधिकारी सध्या तपास यंत्रणांच्या रडावर आहेत.

दि. ६ डिसेंबर रोजी लागलेल्या भीषण आगीत बर्च बाय रोमिओ लेन हा नाईट क्लब जळून भस्मसात झाला होता. या दुर्घटनेत एकूण २५ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटने प्रकरणी गोवा पोलिसांनी रोमिओ लेनचा सहमालक अजय गुप्ता याला दिल्लीतून अटक केली. सध्या तो पोलीस कोठडीत आहे.

दुर्घटनेदिवशी अजय गुप्ता हा गोव्यात होता. मोरजी येथील आपल्या व्हिलामध्ये तो वास्तव्यास होता. बर्च नाईट क्लबला आग आगल्याची माहिती मिळाल्यावर गुप्ता हा पहाटेपर्यंत एका स्थानिक पोलीस अधिकार्‍यासह एका वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍याच्या संपर्कात राहून घटनाक्रमाची माहिती घेत होता.

हणजूण पोलिसांनी या प्रकरणात क्लबच्या व्यवस्थापनावर गुन्हा नोंद केल्याची माहिती मिळाल्यावर दि. ७ रोजी सकाळी ८ वाजता दाबोळी विमानतळावरून गुप्ता दिल्लीला रवाना झाला होता. तर क्लबचे मालक सौरभ लुथरा व गौरव लुथरा हे त्याच दिवशी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास गोव्याहून थायलंडला रवाना झाले होते. या तिन्ही संशयितांना गोव्यातून पसार होण्यासाठी सदर आयपीएस व स्थानिक पोलीस अधिकार्‍यांची मदत मिळाली होती. त्यामुळे रोमिओ लेनच्या मालकांची या अधिकार्‍यांशी असलेल्या घनिष्ठ मैत्रीची चर्चा सध्या राज्य प्रशासनात सुरू आहे.

दरम्यान, संशयित आरोपी अजय गुप्ता हा गोव्यातील आपल्या तिन्ही आस्थापनांचा कारभार हाताळत होता. या आस्थापनांच्या व्यवसायामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, याची जबाबदारी त्याने स्वतःवर घेतली होती. गोव्यातील प्रशासकीय यंत्रणेशी देखील त्याचे चांगले संबंध होते.

अजय गुप्ता हा मूळचा काश्मिरी पंडित असून सध्या दिल्लीत वास्तव्यास आहे. रोमिओ लेन कंपनीच्या नावे चालणार्‍या व्यवसायातून गुप्ता व लुथरा बंधूंची करोडो रुपयांची उलाढाल असून दिल्ली शहराच्या मुख्य अशा ठिकाणी त्यांचे बंगले आहेत. त्यावर करोडो रुपये खर्च करण्यात आले आहेत.

ध्वनी प्रदूषणाचा गुन्हा न नोंदविण्याचे निर्देश

दुर्घटनाग्रस्त बर्च क्लबसह रोमिओ लेन रेस्टॉरन्टविरुद्ध ध्वनी प्रदूषणाचा गुन्हा नोंदवला जाऊ नये, असे निर्देशह एका प्रकरणानंतर सदर अधिकार्‍यांनी हणजूण पोलिसांना दिले होते, अशी माहिती आता या दुर्घटनेनंतर समोर आली आहे.

पर्यटकांवरील मारहाण प्रकरण दाबण्याचा प्रयत्न

गेल्या नोव्हेंबरमध्ये वागातोर येथील रोमिओ लेन रेस्टॉरंटमध्ये वाराणसी, उत्तर प्रदेशमधील पर्यटक कुटुंबाला मारहाण तसेच विनयभंगाचा प्रकार घडला होता. हणजूण पोलिसांनी याप्रकरणी रेस्टॉरन्टच्या बाऊंसर व इतर कर्मचार्‍यांना ताब्यात घेतले होते. या कर्मचार्‍यांची सुटका करण्यासह हे प्रकरण आपापसात मिटवण्याचे निर्देशही त्यावेळी पोलिसांना सदर आयपीएस अधिकार्‍यांनी दिले होते. मात्र, पीडित पर्यटकांच्या ठाम भूमिकेमुळे पोलिसांना याप्रकरणी गुन्हा नोंद करत रेस्टॉरंट कर्मचार्‍यांना अटक करावी लागली होती.