थायलंड सरकारकडून लुथरा यांच्या हद्दपारीची प्रक्रिया पूर्ण

प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन या नाईट क्लबमध्ये घडलेल्या अग्नितांडव प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आणि थायलंडला पसार झालेले क्लबचे मालक गौरव लुथरा व सौरभ लुथरा यांच्या हद्दपारीची प्रक्रिया थायलंड सरकारने पूर्ण केली असून सोमवार किंवा मंगळवारी दोन्ही संशयितांचे भारताकडे प्रर्त्यापण होण्याची शक्यता आहे.
शनिवार, ६ रोजी बर्च नाईट क्लबला भीषण आग लागली होती. या अग्नितांडवात २५ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर क्लबचे मालक सौरभ लुथरा व गौरव लुथरा यांनी थायलंडला, तर सहमालक अजय गुप्ता याने दिल्लीला पलायन केले होते. लुथराबंधू दुर्घटना घडल्यानंतर पहाटे ५.३० च्या विमानाने दाबोळीहून थायलंडला गेले होते व फुकेत शहरात उतरले होते. अजय गुप्ता सकाळी ८ च्या विमानाने दाबोळीहून दिल्लीला घरी गेले होते. गोवा पोलिसांनी गुप्ता यांना १० डिसेंबर रोजी अटक केली होती. संशयित लुथराबंधू थायलंडला पसार झाल्याची माहिती मिळाल्यावर गोवा पोलिसांच्या विनंतीनुसार परराष्ट्र मंत्रालयाने दोन्ही संशयितांचा पासपोर्ट निलंबित केला होता. थालयंड सरकारने संशयितांना पकडून ताब्यात घेतले होते.
हडफडे येथील बर्च क्लबला भीषण आग लागून २५ जणांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे. यामध्ये क्लबचे सहमालक अजय गुप्ता, रोमिओ लेनचे गोवा प्रमुख भरतसिंग कोहली, तसेच व्यवस्थापक राजीव मोडक, प्रियांशू ठाकूर, राजवीर सिंघानिया व विवेक सिंग यांचा समावेश आहे. या प्रकरणी सरकारने तत्कालीन पंचायत संचालक सिद्धी हळर्णकर, तत्कालीन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिव शमिला मोंतेरो व हडफडे-नागवा पंचायतीचे तत्कालीन पंचायत सचिव रघुवीर बागकर यांना सेवेतून निलंबित केले आहे.
संशयितांना घेण्यासाठी गोवा पोलीस दिल्लीला जाणार
थायलंड सरकारने संशयित लुथराबंधूंच्या हद्दपारी संदर्भातील प्रक्रिया पूर्ण केली आहे. सोमवारी तेथील न्यायालयीन प्रक्रियेअंती संशयितांना भारतात पाठवले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोमवारी किंवा मंगळवारी सौरभ लुथरा व गौरव लुथरा यांना भारतात आणले जाणार आहे. हद्दपारीची माहिती थायलंड सरकारकडून मिळाल्यानंतर संशयितांना ताब्यात घेण्यासाठी गोवा पोलिसांचे पथक दिल्लीला जाणार आहे. तिथून संशयितांना गोव्यात आणले जाणार आहे.