महिलेची चौघांविरोधात तक्रार

वास्को : आपल्या मुलाला महाराष्ट्रातील एका पशुवैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्याच्या बहाण्याने चारजणांनी १२ लाख ८६ हजार रुपये घेऊन आपली फसवणूक केल्याची तक्रार मांगोरहिल येथील दीपमाला यांनी वास्को पोलीस स्थानकात केली आहे. याप्रकरणी वास्को पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील नेहा कांबळे, उत्तम कांबळे, सुहासिनी कांबळे व आकाश डांगे यांनी तक्रारदार दीपमाला यांच्या मुलाला महाराष्ट्रातील एका पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी एप्रिल २०२३ ते आजतागत या चौघांनी १२ लाख ८६ हजार रुपये तक्रारदार दीपमाला यांच्याकडून घेतले होते. मात्र, त्या चौघांनी त्या महाविद्यालयात मुलाला प्रवेश दिला नाही किंवा घेतलेली रक्कम परत केली नाही. अशाप्रकारे फसवणूक केल्याने तक्रारदार दीपमाला यांनी पोलीस स्थानकात तक्रार केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्लॅटो कार्वालो पुढील चौकशी करीत आहेत.