जास्त मोबदल्याच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाला ६९.७५ लाखांना गंडवणारा केरळी भामटा अटकेत

पर्वरी येथील ६७ वर्षीय नागरिकाकडून तक्रार दाखल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
जास्त मोबदल्याच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाला ६९.७५ लाखांना गंडवणारा केरळी भामटा अटकेत

पणजी : शेअर ट्रेडिंगमध्ये जास्त मोबदला देण्याचे आमिष दाखवून बार्देश तालुक्यातील एक ज्येष्ठ नागरिकाला ६९.७५ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. या प्रकरणी सायबर विभागाने प्रशांत बोस (६२, एर्नाकुलम, केरळ) याला अटक केली आहे.

या प्रकरणी बार्देश तालुक्यातील पर्वरी येथील ६७ वर्षीय नागरिकाने तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, ५ जुलै आणि २३ जुलै रोजी अज्ञात व्यक्तीने त्याच्याशी वेगवेगळ्या मोबाईल वॉट्सअॅप या सोशल मीडियाच्या इतर माध्यमांद्वारे संपर्क साधून त्यांना शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास जादा मोबदला देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी तक्रारदाराला ८८५७९३०३८३ आणि इतर वॉट्सअॅप मोबाईल धारकांनी तक्रारदाराला “३६०-ONE-HNW.” हा शेअर ट्रेडिंग अॅप डाऊनलोड करण्यास लावले. त्या अॅपद्वारे तक्रारदाराला विविध बँकेच्या खात्यात सुमारे ६९ लाख ७५ हजार रुपये जमा करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याला अॅपवर ५ कोटी रुपये जमा झाल्याचे दाखवण्यात आले. त्याने वरील रक्कम काढण्यासाठी संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता त्याला शुल्क म्हणून आणखी ७५ लाख ७१ हजार ६८५ रुपये जमा करण्यास सांगितले. त्यावेळी त्याला संशय आल्यामुळे त्याने वरील अॅपची चौकशी केली असता, ते बनावट असल्याचे समोर आले. त्यानंतर त्याची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने सायबर विभागात धाव घेत आपली ६९ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली होती. याची दखल घेऊन निरीक्षक दीपक पेडणेकर यांनी अज्ञात वॉट्सअॅप मोबाईल धारकांविरोधात भा. न्या. संं.च्या कलम आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलम अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

सायबर विभागाला एर्नाकुलम, केरळ येथे असलेल्या एका व्यक्तीच्या बँक खात्यात ४६ लाख रुपये जमा झाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अधीक्षक राहुल गुप्ता, साहाय्यक अधीक्षक बी. व्ही. श्रीदेवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक अनिल पोळेकर, हवालदार अनय नाईक आणि कॉ. विनय आमोणकर यांचे पथक केरळला रवाना करण्यात आले. तेथे चौकशीदरम्यान प्रशांत बोस याला अटक करून गोव्यात आणण्यात आले.

संशयिताच्या खात्यात २.१० कोटी

अटक केलेल्या प्रशांत बोस याच्या खात्यात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ, गुजरात आणि गोवा मिळून २३ सायबर फसवणूक गुन्ह्यातील एकूण २.१० कोटी रुपयांची आवक झाल्याचे निष्पन्न झाले.