फोंडा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

फोंडा : येथील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार व तिला मारझोड करून फरार असलेल्या आरोपीस पकडण्यात फोंडा पोलिसांना यश आले आहे. आरोपीला गजाआड केल्याप्रकरणी फोंडा पोलिसांचे कौतुक होत आहे.
अल्पवयीन युवती व संशयित अभिषेक राठोड यांची मैत्री होती. या मैत्रीचा गैरफायदा घेत अभिषेक याने अल्पवयीन मुलीला कर्नाटक येथे फूस लावून पळवून नेले. तिथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले व तिला मारझोड करून सोडून दिले.
दि. ५ नोव्हेंबर रोजी मुलीच्या वडिलांनी फोंडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, तपास केला असता मुलगी कर्नाटक येथे असल्याचे आढळून आले होते. ७ नोव्हेंबर रोजी कर्नाटक पोलीस व चाईल्ड वेल्फेअर कमिटी कर्नाटक यांच्या सहकार्याने सदर मुलीला गोव्यात आणण्यात आले.
त्या दिवसापासून अभिषेक राठोड हा फरार होता. त्याचा थांगपत्ता लागत नव्हता. पूर्वीचा मोबाईल वापरणे त्याने बंद केल्याने नेमके त्याला पकडायचे कसे? हा यक्षप्रश्न पोलिसांसमोर होता. मात्र, निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी वेगळ्या तऱ्हेने तपास सुरू केला. सुरुवातीला त्या मुलाच्या वडिलांचे कॉल डिटेल्स तपासले असता एका नंबरवर त्यांचा संशय येऊन थांबला. त्या अनुषंगाने तपास केल्यानंतर तो नंबर संशयित मुलाचा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी लगेचच एक टीम कर्नाटक येथे पाठवून अभिषेक राठोड याला सिंधोगी, जिल्हा कोपल, कर्नाटक येथून ताब्यात घेतले. त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.