डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या तत्परतेने वाचला जीव

बेळगाव : गोवा–दिल्ली इंडिगो विमान प्रवासादरम्यान अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत खानापूरच्या माजी आमदार व एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी आपल्या वैद्यकीय कौशल्याच्या जोरावर एका परदेशी तरुणीचा जीव वाचविला.
प्रवासादरम्यान संबंधित तरुणीला तीव्र हृदयविकाराचा झटका येऊन ती बेशुद्ध पडली, त्यामुळे विमानात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यावेळी सहप्रवासी असलेल्या डॉ. अंजलीताईंनी तत्काळ पुढाकार घेत तरुणीची तपासणी केली. नाडी तपासल्यानंतर त्यांनी तातडीने कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन (सीपीआर) देत तिला शुद्धीवर आणले.
सुमारे अर्ध्या तासानंतर तरुणीला पुन्हा झटका आल्याने ती पुन्हा बेशुद्ध झाली. मात्र, गंभीर परिस्थितीतही डॉ. अंजलीताईंनी प्रसंगावधान राखत दुसऱ्यांदा वैद्यकीय उपचार करून तिची प्रकृती स्थिर केली. त्यानंतर गोवा ते दिल्ली या सुमारे दोन ते अडीच तासांच्या उर्वरित प्रवासादरम्यान त्या तरुणीच्या शेजारी उभे राहून सतत देखरेख आणि आवश्यक सेवा पुरवली.
दिल्ली विमानतळावर विमान उतरताच वैमानिक व कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने आधीच सज्ज ठेवलेल्या रुग्णवाहिकेतून तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. अंजलीताईंच्या समयसूचक व मोलाच्या वैद्यकीय सेवेबद्दल वैमानिकांसह सहप्रवाशांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे आभार मानले.