गुन्हा कबुल केला, तरी सुनावणी पूर्ण न करता शिक्षा देता येत नाही!

चिमुकलीच्या खूनप्रकरणी मातेची जन्मठेप रद्द : पुन्हा सुनावणी घेण्याचे निर्देश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
14th December, 11:28 pm
गुन्हा कबुल केला, तरी सुनावणी पूर्ण न करता शिक्षा देता येत नाही!

पणजी : बार्देश तालुक्यातील स्वतःच्या पाच महिन्यांच्या चिमुकलीचा लाटणीच्या सहाय्याने रागाच्या भरात आईने खून केला होता. आईने गुन्हा कबुल केल्यामुळे सुनावणी पूर्ण न करता शिक्षा देता येत नाही. तसेच तिची मानसिक स्थिती ठिक नव्हती, असे निरीक्षण नोंदवून बाल न्यायालयाने आईला दिलेली जन्मठेपेची शिक्षा गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. तसेच पुन्हा सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

याबाबतचा आदेश न्या. सारंग कोतवाल आणि न्या. आशिष चव्हाण या द्विसदस्यीय न्यायपीठाने दिला.

कोलवाळ पोलिसांनी १४ ऑगस्ट २०२२ रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, कपेलवाडा सिरसई येथील पाच महिन्यांच्या चिमुकलीचे वडील सुदन गोंडलेकर यांनी १४ ऑगस्ट २०२२ रोजी उत्तररात्री ३.३० च्या सुमारास मुलीला रक्ताच्या थारोळ्यात बास्केटमध्ये घालून कोलवाळ पोलीस स्थानक गाठले होते. पोलिसांनी त्वरित चिमुकलीला म्हापशातील जिल्हा इस्पितळात दाखल केले असता डॉक्टरांनी तिचा आधीच मृत्यू झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर हा खुनाचा प्रकार उघडकीस आला होता. पोलिसांनी खून प्रकरणी मृत चिमुकलीच्या आई आर्मिंदा डोरा फर्नांडिस आणि वडील सुदन गोंडलेकर या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करून १४ ऑगस्ट २०२२ रोजी त्या दोघांविरोधात भा. दं. संहितेच्या ३०२ व गोवा बाल कायदा कलम ८ नुसार गुन्हा नोंद केला. या प्रकरणी त्या दोघांनी आपल्या जबाबात वारंवार बदल करण्याचा प्रयत्न केला होता.

पोलिसांनी कसून चौकशी केली असता, आई आर्मिंदा डोरा फर्नांडिस हिने रागाच्या भरात मुलीला हातातील लाटणीने मारहाण केल्याचे समोर आले. त्यातच तिचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी वडिलांना सोडून आईला अटक केली होती. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी आईच्या विरोधात ३० साक्षीदारांची साक्ष नोंदवून २०० पानी आरोपपत्र म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात दाखल केले. हे प्रकरण बाल न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत असल्यामुळे तिथे वर्ग करण्यात आले. बाल न्यायालयाने प्रथमदर्शनी पुराव्याची दखल घेऊन आईविरोधात आरोप निश्चित करून खटला सुरू केला. याच दरम्यान साक्षीदारांची उलटतपासणी सुरू असताना आईने गुन्ह्याची कबुली दिली. बाल न्यायालयाने कबुली मान्य करून आईला दोषी ठरवून तिला जन्मठेपेची शिक्षा दिली. या शिक्षेला गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. या प्रकरणी आईतर्फे अॅड. विठ्ठल नाईक यांनी बाजू मांडली. त्यात त्यांनी गंभीर गुन्ह्यात आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली होती. तिची विनंती स्वीकारून, तिला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. तसेच तिची मानसिक स्थिती ठिक नव्हती. अशास्थितीत खटल्याची सुनावणी पूर्ण करून निकाल देण्याची प्रक्रिया करण्याची आवश्यकता होती. मात्र, तसे न केल्याचा दावा अॅड. नाईक यांनी उच्च न्यायालयात मांडला. या प्रकरणी न्यायालयाने दोन्ही बाजू एेकून घेतल्यानंतर वरील निरीक्षण नोंदवून जन्मठेपेची शिक्षा रद्द करून पुन्हा सुनावणी घेण्याचा निर्देश दिला.