युवतीवर लैंगिक अत्याचार : कनिष्ठ श्रेणी अधिकाऱ्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला

अधिकाऱ्याकडून उच्च न्यायालयात आव्हान

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
50 mins ago
युवतीवर लैंगिक अत्याचार : कनिष्ठ श्रेणी अधिकाऱ्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला

पणजी : लग्नाचे आमिष दाखवून २४ वर्षीय युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणातील नागरी सेवेतील कनिष्ठ श्रेणी अधिकाऱ्याचा अटकपूर्व जामीन अर्ज म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. या आदेशाला अधिकाऱ्याने गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

या प्रकरणी तिसवाडी तालुक्यातील २४ वर्षीय युवतीने पणजी महिला पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, २७ वर्षीय नागरी सेवेतील कनिष्ठ श्रेणी अधिकाऱ्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे म्हटले. संबंधित अधिकारी आणि पीडित युवतीची १२ मार्च २०२३ रोजी दक्षिण गोव्यात एका खासगी कार्यक्रमात ओळख झाली. त्यांच्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. याच दरम्यान, एप्रिल २०२३ मध्ये संबंधित अधिकाऱ्याने तिला लग्नाची मागणी घातली. त्यानंतर अधिकाऱ्याने ४ मे २०२३ रोजी दक्षिण गोव्यातील त्याच्या फ्लॅटवर, तसेच ७ जून २०२५ रोजी अधिकाऱ्याच्या घरी कोणी नसताना संधी साधून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याची दखल घेऊन महिला पोलीस उपनिरीक्षक रुपाली गोवेकर यांनी अधिकाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६९, ११५(२) आणि ३५२ कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

गुन्ह्याची माहिती मिळताच या अधिकाऱ्याने मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या प्रकरणी न्यायालयाने दोन्ही बाजू एेकून घेतल्यानंतर अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. याच दरम्यान अधिकाऱ्याने गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. 

हेही वाचा