पुढील सुनावणी १२ जानेवारी २०२६ रोजी

पणजी : रोमिओ लेनच्या नाईट क्लबला आग लागून २५ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेची चौकशी न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने स्वेच्छा याचिकेला जोडली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे.
ऐश्वर्या साळगावकर यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी राज्य सरकार, हडफडे- नागोवा पंचायत, जिल्हाधिकारी कार्यालय, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, पंचायत संचालनालय, गोवा किनारी क्षेत्रीय व्यवस्थापन प्राधिकरण, नगर नियोजन खाते, बिईंग एफएस पॅसिफिक हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. व इतरांना प्रतिवादी केले आहे.
हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन क्लबमध्ये ६ आणि ७ डिसेंबर २०२५ च्या मध्यरात्री भयानक अग्निकांडात २५ जणांचा मृत्यू झाला. या आगीची चौकशी सध्या उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकित यादव यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती सुरू आहे.
या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ जानेवारी रोजी ठेवली आहे. याच दरम्यान वरील जनहित याचिकेची सुनावणी मंगळवारी झाली असता, याचिकादार तर्फे अॅड. गौरिष अग्नी यांनी वरील मुद्याची माहिती न्यायालयाला दिली. तसेच एकच विषय असल्याचे सांगितले. त्यानंतर न्यायालयाने वरील याचिका स्वेच्छा जनहित याचिकेला जोडली.
न्यायालयाने घेतली स्वेच्छा दखल
प्रदीप घाडी आमोणकर आणि सुनील दिवकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यात त्यांनी वरील दुर्घटनेची माहिती देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. याचिकादारातर्फे अॅड. रोहित ब्राझ डिसा यांनी या दुर्घटनेची माहिती देत संबंधित क्लबला कशा पद्धतीने अभय देण्यात आला त्याची माहिती दिली. तसेच क्लब जमीनदोस्त करणाऱ्या आदेशाला पंचायत संचालनालयाने स्थगित दिली होती. त्यानंतर अवैध बांधकामांमध्ये व्यावसायिक व्यवसाय सुरूच असल्याची माहिती दिली. याची दखल घेऊन न्यायालयाने स्वेच्छा दखल घेतली आणि अॅड. रोहित ब्राझ डिसा यांची अमिकस क्यूरी म्हणून नियुक्ती केली.