शाळांमध्ये कुत्र्यांच्या संरक्षणाची ‘एसओपी’ बंधनकारक!

शिक्षण खात्याचे राज्यातील शाळा, कॉलेजला निर्देश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
शाळांमध्ये कुत्र्यांच्या संरक्षणाची ‘एसओपी’ बंधनकारक!

पणजी : गोव्यात लहान मुलांसह ज्येष्ठांना कुत्रे चावण्याचे किंवा त्यांच्यावर हल्ले करण्याचे प्रकार वाढले आहेत. विद्यार्थी आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी सर्वोच्च न्यायालयाने शिफारस केलेल्या विशेष ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर’ला (एसओपी) मान्यता दिली आहे. याची अंमलबजावणी म्हणून, राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांनी सदर नियमावली सूचना फलकांवर लावावी, असे परिपत्रक शिक्षण विभागाने जारी केले आहे.
विद्यार्थी आणि लहान मुलांचे कुत्र्यांपासून संरक्षण करण्यासाठी त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करणे हा या एसओपीचा मुख्य उद्देश आहे. या नियमावलीत कुत्र्यांच्या हालचाली आणि धोक्याची चिन्हे ओळखण्याबद्दल मार्गदर्शन केले आहे. कुत्र्याने दात दाखवल्यास किंवा तो शेपटी हळू हलवत असल्यास तो धोकादायक असू शकतो, हे विद्यार्थ्यांनी ओळखायला शिकले पाहिजे. अशा स्थितीत कुत्र्याकडे टक लावून पाहणे टाळावे. अनोळखी कुत्र्यांना जवळून स्पर्श करू नये किंवा त्यांच्याशी लाड करण्याचा प्रयत्न करू नये. कुत्रे झोपलेले असल्यास त्यांच्या वाटेला जाऊ नये किंवा त्यांच्यासोबत खेळू नये.
कुत्र्याने हल्ला केल्यास स्वतःचा बचाव कसा करावा, याविषयीच्याही सूचना एसओपीमध्ये देण्यात आल्या आहेत. कुत्र्याने हल्ला केल्यास, मध्ये पिशवी, काठी किंवा जॅकेट आडवे धरून स्वतःचा बचाव करावा. चेहरा, छाती, गळा आदी संवेदनशील भाग सुरक्षित ठेवावेत. पाळीव कुत्र्यांच्या मालकांनी त्यांची योग्य काळजी घ्यावी, अशा अनेक महत्त्वाच्या सूचना या एसओपीमध्ये आहेत. शिक्षण संस्थांनी ही नियमावली तातडीने सूचना फलकांवर लावणे आवश्यक आहे. 

हेही वाचा