मॉडेल्स कन्स्ट्रक्शन्सच्या मालकाच्या घरासह कार्यालयावर ‘ईडी’चा छापा

करंझाळेत झाडाझडती : जमीन खरेदी प्रकरणात कारवाई

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
मॉडेल्स कन्स्ट्रक्शन्सच्या मालकाच्या घरासह कार्यालयावर ‘ईडी’चा छापा

पणजी : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवार, १६ रोजी पहाटे सात वाजल्यापासून करंझाळे येथील मॉडेल्स कन्स्ट्रक्शन्सच्या मालकाच्या घरासह कार्यालयावर छापा टाकण्यात आला. दरम्यान, ही कारवाई रात्री ९ वाजता समाप्त झाली. या प्रकरणी मेरशी येथील सत्र न्यायालयाने मॉडेल्स कन्स्ट्रक्शन्सच्या तिघा भागीदारांना १ लाख रुपये व इतर अटीवर अटक न करण्याची अंतरिम दिलासा दिला आहे.
या प्रकरणी पणजी पोलिसांनी १८ जानेवारी २०१० रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, या प्रकरणी दत्ताराम तनू गावस उर्फ काणकोणकर यांनी तक्रार दाखल केली होती. त्यात त्यांनी पणजी शहर चलता क्रमांक ४४ पीटी शीट क्रमांक १६२ मधील २,४७५ चौ. मी. जमिनीत तक्रारदाराचे वडील कूळ म्हणून नोंद होते. असे असताना १८ नोव्हेंबर २००४ ते ५ डिसेंबर २००६ रोजी या कालावधीत संशयित फा. आर्लिनो डीमेलो आणि फा. व्हिक्टर फर्नांडिस यांनी पणजी शहर सर्व्हेमध्ये आर्चडिओसीज ऑफ गोवा नावाची नोंद करण्याचा अर्ज सादर केला. त्यानुसार, तत्कालीन सर्व्हे संचालनालयाचे निरीक्षक प्रभाकर आर. हवालदार यांनी ५ डिसेंबर २००६ रोजी निवाडा देत वरील आर्चडिओसीज ऑफ गोवा नावाची नोंदी केली. त्यानंतर २००७ मध्ये वरील जमीन मॉडेल्स कन्स्ट्रक्शन्सने खरेदी करून रहिवासी विकास प्रकल्प हाती घेतला. या तक्रारीची दखल घेऊन पणजी पोलिसांनी १८ जानेवारी २०१० रोजी संशयित म्हणून फा. आर्लिनो डिमेलो, फा. व्हिक्टर फर्नांडिस आणि प्रभाकर हवालदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यासंदर्भात न्यायालयात अंतिम अहवाल सादर करून तपास बंद करण्याची मागणी केली. दरम्यान न्यायालयाने वरील मागणी फेटाळून तपास पुन्हा करण्याचे निर्देश जारी केले. दरम्यान २०२० मॉडेल्स कन्स्ट्रक्शन्सच्या मालकाचे निधन झाले.
याच दरम्यान सक्तवसुली संचालनालयाने कारवाई सुरू केली होती. दरम्यान ईडीने माॅडेल्सच्या विद्यमान भागीदारांची तीनवेळा चौकशी केली. त्यानंतर १६ डिसेंबर रोजी पहाटे सात वाजल्यापासून ईडीने करंझाळे येथील मॉडेल्स कन्स्ट्रक्शन्सच्या मालकाच्या घरासह कार्यालयावर छापा टाकण्यात आला. त्यात त्यांनी भागीदारांचे मोबाईल फोन, २००७ ते २०१३ काळात वरील जमिनीत रहिवासी प्रकल्प उभारून दुकाने आणि फ्लटचे विक्री केलेले दस्तावेज तसेच माॅडेल्स कंपनीने दुबईत गुंतवणूक केलेल्या दस्तावेज जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे ५५ कोटी रुपयांची मालमत्तेचे दस्तावेज जप्त केल्याचे समोर आले आहे.
तिघा भागीदारांना अटकेपासून अंतरिम दिलासा
छापासत्र सुरू असताना मॉडेल कन्स्ट्रक्शनच्या तीन भागीदारांनी मेरशी येथील सत्र न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. या प्रकरणी न्यायालयाने तिघा भागीदारांना १ लाख रुपये आणि इतर अटींवर अटकेपासून अंतरिम दिलासा दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ रोजी होणार आहे.

हेही वाचा