रेडकर, बागकरांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी २३ पर्यंत तहकूब

बर्च दुर्घटना : सरपंचांना जबाबदार धरणे अयोग्य : अॅड. सरदेसाई

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
4 hours ago
रेडकर, बागकरांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी २३ पर्यंत तहकूब

म्हापसा : हडफडे-नागवा सरपंच रोशन रेडकर आणि तत्कालिन पंचायत सचिव रघुवीर बागकर यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी येत्या २३ डिसेंबरपर्यंत म्हापसा अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने तहकूब केली.
मंगळवारी, रेडकर यांच्यातर्फे वरिष्ठ वकील अॅड. नितीन सरदेसाई यांनी युक्तिवाद केला. तर सरकारी वकील जेनिफर सांतामारीया यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली. यावेळी रघुवीर बागकर यांच्यातर्फे अॅड. राजू पोवळेकर हे न्यायालयात हजर होते. सरपंच रोशन रेडकर यांच्या वकिलांनी दीड तास न्यायालयात युक्तिवाद केला. त्यानंतर, रेडकर तसेच बागकर यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी न्यायाधीश द्विजपल पाटकर यांनी २३ रोजी निश्चित केली. त्या दिवशी बागकर यांचे वकीलही न्यायालयात युक्तिवाद करतील.
युक्तिवाद करताना अॅड. सरदेसाई म्हणाले की, आपले अशील हे हणजूण पोलिसांना तपासात पूर्णपणे सहकार्य करत आहेत. हणजूण पोलिसांच्या दाव्यानुसार, सरपंचांनी बर्च क्लबला व्यापार परवाना दिला. मात्र, हा निर्णय एकट्या सरपंचांचा नव्हे तर हडफडे-नागवा पंचायत मंडळाचा सर्वानुमते होता. व्यापार परवाना दिला याचा अर्थ क्लबस्थळी जे इलेक्ट्रॉनिक फटाके लावले, ते संरपंचांनी लावायला सांगितले, असा होत नाही.
या घटनेचे व्हिडिओ सर्वांनीच सोशल मीडियावर पाहिले आहेत. त्यामुळे आगीच्या दुर्घटनेला आपल्या अशीलाचा काहीच संबंध येत नाही. घटनेदिवशी क्लब रात्री उशिरापर्यंत सुरू होता. प्रत्यक्षात संगीत वाजविण्याची परवानगी रात्री १० पर्यंत असते. तरीही मध्यरात्रीपर्यंत संगीत वाजत होते. मग, पोलीस यंत्रणा कुठे होती, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सरपंच हे स्थानिक लोकप्रतिनिधी व गावचे रहिवासी आहेत. पोलिसांनी आवश्यक कागदपत्रे हडफडे-नागवा पंचायत कार्यालयातून याआधीच हस्तगत केली आहेत. त्यामुळे पोलिसांना नक्की कोणत्या कारणांसाठी सरपंचांची कोठडी हवी आहे. घटनेच्या पाच दिवस अगोदर आपल्या अशीलाशी क्लबच्या मालकाने संपर्क साधला होता. सरपंच या नात्याने ते अनेकांच्या संपर्कात येतात. या कारणावरून त्यांना अशा प्रकरणात गुंतवले जाऊ शकते का, असा सवाल उपस्थित करीत अॅड. सरदेसाई यांनी रेडकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करावा, अशी विनंती न्यायालयाकडे केली.
संशयितांचा अंतरिम जामीन फेटाळला
बर्च बाय रोमिओ लेन क्लब आग दुर्घटनेप्रकरणी हणजूण पोलिसांनी अटक केलेल्या संशयित विवेक सिंग, प्रियांशू ठाकूर व राजवीर सिंघानिया यांचा अंतरिम जामीन विनंती अर्ज न्यायालयाने फेटाळला. आता तिघाही संशयितांच्या जामीन अर्जावर १८ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

हेही वाचा