मौल्यवान वस्तूंसह रोख भक्ष्यस्थानी : सात ते आठ लाखांची हानी

डिचोली : बामणवाडा - नानोडा, डिचोली येथील उमेश भालचंद्र कानोळकर यांच्या कौलारू जुन्या घराला अचानक आग लागून घरातील मौल्यवान वस्तूंसह घरातील एका नातेवाईकाच्या लग्नासाठी दागिने खरेदी करण्यासाठी ठेवण्यात आलेले अडीच लाख आणि घरात जमवून ठेवलेले एक लाख मिळून सुमारे साडेतीन लाख रोख भस्मसात झाले. प्राथमिक अंदाजानुसार घराचे सुमारे सात ते आठ लाखांचे नुकसान झाले.
घराला आग लागण्याची घटना बुधवारी दुपारी २ वा.च्या दरम्यान घडली. घरातील मंडळी कामानिमित्त सकाळपासून घराबाहेर होते. घराला आग लागल्याची माहिती प्रथम शेजाऱ्यांना समजली. लोक जमा होताच डिचोली अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाचे लीडिंग फायर फायटर महेश नाईक, ड्रायव्हर ऑपरेटर शामसुंदर पाटील, जवान वासुदेव ताटे, सुभाष माजीक व विष्णू राणे यांनी लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. तोपर्यंत घरातील सोफा सेट, दोन नवीन कपाट, टीव्ही, रेफ्रिजरेटर, जमिनीसंबंधित कागदपत्रे, नातेवाईकांच्या लग्न समारंभासाठी खरेदी केलेले कपडे, शैक्षणिक कागदपत्रे, प्रशस्तिपत्रके, तसेच साडेतीन लाख रुपये आगीत जळून खाक झाले.
आगीमुळे उमेश कानोलकर यांच्या कुटुंबाचे अंदाजे सात ते आठ लाखांचे नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये हे घटनास्थळी दाखल होऊन घटनेची पाहणी केली. आपल्याकडून एक लाखाची त्वरित मदत जाहीर केली. शासकीय यंत्रणांकडून सहाय्य तसेच एनजीओकडे संपर्क साधत नवीन घर उभारणीसाठी प्रयत्न करणार असे आश्वासन कुटुंबाला दिले. त्याचबरोबर डिचोली उपजिल्हाधिकारी यांना निर्देश देऊन तलाठीकडून घटनेचा अहवाल मागितला आहे.
माजी आमदार नरेश सावळ यांनी जिल्हा पंचायत अपक्ष उमेदवार मेघश्याम राऊत यांच्याबरोबर घटनास्थळी दाखल होऊन घटनेची पाहणी केली. कुटुंबाला धीर देऊन नवीन घर उभारणीसाठी प्रयत्न करणार असे आश्वासन दिले
कानोलकर यांचे कुटुंब बेघर झाले असून त्यांची सध्या राहण्याची जबाबदारी मुळगाव येथील एका नातेवाईकाने घेतली आहे. डिचोली पोलीस स्थानकाचे निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्ययक उपनिरीक्षक लक्ष्मण घाडी यांनी पंचनामा केला.
घातपाताचा संशय व्यक्त
सकाळी घरातून बाहेर पडताना घरातील लाईट बंद करून गेलो होतो. त्यामुळे सदरची आग ही शॉर्टसर्किटमुळे नसल्याची शक्यता आहे. घराचा मागील दरवाजा उघडा होता, पोलिसांनी त्यादृष्टीने तपास करावा, अशी मागणी घरमालक उमेश कानोलकर यांनी केली.