
देहरादून : समाज माध्यमावर झालेल्या वादाचा शेवट जीवघेण्या हल्ल्यात झाला असून उत्तराखंडमधील देहरादून येथे पत्रकार पंकज मिश्रा यांचा मारहाणीत मृत्यू झाला. सोमवारी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास काही जणांनी घरात घुसून पंकज मिश्रा यांच्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला केल्याची माहिती देहरादूनचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अजय सिंग यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्रकार पंकज मिश्रा आणि आरोपी अमित सेहगल हे एकमेकांच्या ओळखीचे होते. समाज माध्यमांवर दोघांमध्ये वाद झाला होता. अमित सेहगल हा देखील डिजिटल मीडिया क्षेत्रात कार्यरत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पंकज मिश्रा यांचे भाऊ अरविंद मिश्रा यांनी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, आरोपी अमित सेहगल काही साथीदारांसह पंकज मिश्रा यांच्या घरी गेला. तेथे शिवीगाळ करत त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. अमित सेहगलने पंकज यांच्या छातीवर जोरदार ठोसे मारले तसेच पोटावर लाथा घातल्या. या मारहाणीत पंकज यांच्या तोंडातून रक्त येऊ लागले, असे ‘एफआयआर’मध्ये नमूद करण्यात आले आहे.
मारहाणीनंतर पंकज मिश्रा जखमी अवस्थेत होते आणि त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली होती. आरोपींनी पंकज व त्यांच्या पत्नीचा मोबाईल फोन हिसकावून घेऊन घटनास्थळावरून पलायन केले. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी पंकज मिश्रा यांना लेखी तक्रार देण्यास व वैद्यकीय उपचार घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र, मंगळवारी पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. आरोपी अमित सेहगल याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३, ३०४, ३३३ आणि ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.