आयपीएल लिलावात कॅमेरून ग्रीनचा ऐतिहासिक विक्रम

केकेआरने मोजले २५.२० कोटी : चेन्नईचा अनकॅप्ड खेळाडूंवर जुगार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16th December, 09:57 pm
आयपीएल लिलावात कॅमेरून ग्रीनचा ऐतिहासिक विक्रम

अबु धाबी : येथे झालेल्या आयपीएल २०२६ च्या लिलावात पैशांचा पाऊस पडला. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनने इतिहास रचला. कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) ग्रीनला तब्बल २५.२० कोटी रुपयांची बोली लावून आपल्या ताफ्यात सामील केले. या ऐतिहासिक बोलीमुळे ग्रीन हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला.

ग्रीनवर पैशांचा पाऊस आणि बीसीसीआयचा नियम
ग्रीनचे नाव पुकारताच लिलावाच्या हॉलमध्ये खळबळ उडाली. मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील चुरशीच्या लढतीनंतर अखेर केकेआरने २५.२० कोटींची अंतिम बोली लावत बाजी मारली. ग्रीनने मिचेल स्टार्कचा २४.७५ कोटींचा विक्रम मोडीत काढला. मात्र, बीसीसीआयच्या नवीन नियमांनुसार परदेशी खेळाडूंसाठी १८ कोटींची पगार मर्यादा असल्याने, ग्रीनला प्रत्यक्षात १८ कोटी रुपयेच मिळतील. उर्वरित रक्कम बीसीसीआयच्या ‘प्लेअर डेव्हलपमेंट फंड’मध्ये जमा होईल.

अनकॅप्ड खेळाडूंवर २८ कोटींचा खर्च
चेन्नई सुपर किंग्सने या लिलावात सर्वांना धक्का देत अनकॅप्ड (ज्यांनी आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही) भारतीय खेळाडूंवर मोठा जुगार खेळला. सीएसकेने प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा या दोन युवा खेळाडूंना प्रत्येकी १४.२० कोटी रुपयांना खरेदी केले. ३० लाख मूळ किंमत असलेल्या या खेळाडूंना मिळालेली ही रक्कम थक्क करणारी आहे. हे दोन्ही खेळाडू आता आयपीएल इतिहासातील सर्वात महागडे अनकॅप्ड खेळाडू ठरले.

केकेआरची ४३ कोटींची उधळण
केकेआरने केवळ ग्रीनवरच नाही, तर श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथिशा पथिराना यालाही १८ कोटी रुपयांना खरेदी केले. या दोन खेळाडूंसाठीच केकेआरने ४३ कोटींहून अधिक रक्कम खर्च केली. याशिवाय बांगलादेशचा मुस्तफिजुर रहमान (९.२ कोटी) आणि फिन ॲलन (२ कोटी) हे देखील केकेआरच्या ताफ्यात आले.

व्यंकटेश अय्यर आरसीबीत, इतर खरेदी
गेल्या हंगामात केकेआरकडून खेळलेल्या व्यंकटेश अय्यरला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ७ कोटी रुपयांना खरेदी केले. तर फिरकीपटू रवी बिश्नोईला राजस्थान रॉयल्सने ७.२० कोटी रुपयांना घेतले. दिल्ली कॅपिटल्सने काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबी याला ८.४ कोटी रुपयांना खरेदी करत गोलंदाजी मजबूत केली. डेव्हिड मिलर (२ कोटी) आणि बेन डकेट (२ कोटी) हे दोन्ही अनुभवी खेळाडू दिल्लीला स्वस्तात मिळाले.

सर्वाधिक बोली लागलेले खेळाडू

खेळाडू मूळ किंमत अंतिम किंमत संघ
कॅमरून ग्रीन २ कोटी २५.२० कोटी कोलकाता
मथिशा पाथिराणा २ कोटी १८ कोटी कोलकाता
कार्तिक शर्मा ३० लाख १४.२० कोटी चेन्नई
प्रशांत वीर ३० लाख १४.२० कोटी चेन्नई
लियाम लिव्हिंगस्टन २ कोटी १३ कोटी हैदराबाद
मुस्तफिजूर रहमान २ कोटी ९.२० कोटी कोलकाता
जोश इंग्लिश २ कोटी ८.६० कोटी लखनौ
आकिब नबी डार ३० लाख ८.४० कोटी दिल्ली
#IPLAuction2026 #CameronGreen #KKR #CSK #CricketNews #IPL2026 #AbuDhabiAuction