थायलंडहून येताच दिल्लीत घेतले ताब्यात : दिल्ली न्यायालयाकडून २ दिवसांचा ट्रान्झिट रिमांड

सुनावणीनंतर सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा यांना दिल्लीतील पटियाळा न्यायालयातून बोहर नेताना पोलीस.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : साकवाडी, हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन क्लब आग दुर्घटनेतील मुख्य संशयित आणि क्लबचे मालक सौरभ लुथरा व गौरव लुथरा यांचे थायलंडने भारताला प्रत्यार्पण केले. नवी दिल्ली विमानतळावर ते उतरताच गोवा पोलिसांनी त्यांचा ताबा घेतला. बुधवारी सकाळी ११ वा. दोघांनाही घेऊन पोलीस गोव्यात पोहोचतील. दिल्ली न्यायालयाने संशयितांना गोव्याला नेण्यासाठी ४८ तासांचा ट्रांझिट रिमांड दिला आहे. फरार लुथरा बंधू आता १० दिवसांनंतर गोव्यात दाखल होणार आहेत.
थायलंडला गेलेले संशयित आरोपी लुथराबंधू मंगळवारी दुपारी दिल्ली विमानतळावर उतरले. सीबीआयकडून दोघाही संशयितांना गोवा पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आले. सायंकाळी दोघाही संशयितांची द्वारका येथील इंदिरा गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्टिपलमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तिथून त्यांना पटियाला प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आले. गोवा पोलिसांना संशयितांना घेऊन जाण्यासाठी कायदेशीर प्रवासासाठी दोन दिवसांचा ट्रान्झिट रिमांड न्यायालयाच्या न्यायाधीश ट्विंकल चावला यांनी मंजूर केला. गोव्यात बुधवारी सकाळी ११ वा. दाबोळी विमानतळावर संशयित लुथराबंधूंना घेऊन पोलीस पोहोचणार आहेत. दिल्लीहून येणारे त्यांचे विमान सकाळी ११ च्या सुमारास दाबोळी विमानतळावर दाखल होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
थायलंड सरकारची संशयितांची हकालपट्टीची प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे आयपीएस अधिकारी श्रीदवी बी.व्ही. यांच्या नेतृत्वाखालील गोवा पोलिसांचे पथक सोमवार, १५ रोजी रात्री दिल्लीला रवाना झाले होते. यामध्ये निरीक्षक राहुल परब, सूरज गावस, उपनिरीक्षक मंदार परब, साहिल वारंग, हवालदार सुशांत चोपडेकर, कॉन्स्टेबल सत्येंद्र नास्नोडकर, प्रकाश पोळेकर व अभिषेक कासार यांचा समावेश आहे.
हडफडे येथील बर्च क्लबला ६ डिसेंबर रोजी रात्री लागलेल्या भीषण आगीत क्लब जळून खाक झाला होता. यामध्ये २५ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेने गोव्यासह संपूर्ण देश हादरला होता. मात्र, या आगीच्या घटनेनंतर क्लबचे मालक सौरभ लुथरा व गौरव लुथरा यांनी थायलंडला पलायन केले होते. गोवा पोलिसांच्या विनंतीनुसार केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने संशयितांच्या विरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी करून त्यांचे पासपोर्ट निलंबित केले होते. दोघाही संशयितांना थायलंड इंटरपोलने ताब्यात घेतले. त्यांची भारतात हकालपट्टी करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. आठ दिवसांच्या प्रक्रियेनंतर संशयितांना मंगळवारी भारतात पाठवण्यात आले. आता बुधवार, १७ रोजी सकाळी ११ वा. ते गोव्यात येणार आहेत.