बार्देश तालुक्यातील समितीची वागातोर-हणजूण येथे कारवाई

हणजूण येथील ‘मयान’ क्लबला सील ठोकताना अधिकारी.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : अग्निशमन दलाचा अग्निसुरक्षेशी निगडित ‘ना हरकत’ दाखला आणि बांधकामाला आवश्यक असलेली ‘स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी’ (संरचनात्मक स्थिरता) नसल्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बार्देश तालुक्यातील तीन आस्थापने मंगळवारी बंद करण्यात आली आहेत. वरिष्ठ नागरी सेवा अधिकारी कबीर शिरगावकर यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त अंमलबजावणी समितीने वागातोर - हणजूण येथील ‘क्लारा’, ‘सालुद’ आणि ‘मयान’ या तीन क्लबना टाळे ठोकण्यात आले.
हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन क्लबला शनिवार, ६ रोजी मध्यरात्री भीषण आग लागली होती. त्या दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेचा तपास दंडाधिकारी समितीमार्फत सुरू करण्यात आला आहे. राज्यातील किनारी भागातील आस्थापनांच्या बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई करण्यासाठी नागरी सेवेच्या वरिष्ठ श्रेणी अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली संयुक्त अंमलबजावणी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यानुसार, बार्देश तालुक्यात कारवाई करण्यासाठी नागरी सेवेतील अधिकारी कबीर शिरगावकर यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता बालाजी फडते, म्हापसा एस्काॅर्ट सेलचे पोलीस निरीक्षक निखिल पालेकर, स्टेशन फायर ऑफिसर सुशील मोरजकर आणि कार्यकारी अभियंता आशिष राजपूत यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला. या समितीने मंगळवारी अग्निशमन दलाचा अग्निसुरक्षेशी निगडित ‘ना हरकत’ दाखला नसल्यामुळे वागातोर-हणजूण येथील ‘सालुद’ आणि ‘मयान’ तर स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी (संरचनात्मक स्थिरता) नसल्यामुळे ‘क्लारा’ क्लबला सील ठोकण्यात आले.
आतापर्यंत सात आस्थापनांने केली बंद
बार्देशमधील समितीने यापूर्वी ‘दियाज’ क्लब, ‘कॅफे सीओ २’ आणि ‘गोया’ या तीन क्लबना सील केले आहे. काणकोण आणि केपे तालुका समितीने काब दे रामा येथील प्रसिद्ध ‘दी कॅप गोवा’ आस्थापनाला सील ठोकले आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे राज्यातील एकूण ७ आस्थापने सील करण्यात आली आहेत.