
पाटणा : मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका कार्यक्रमादरम्यान महिला डॉक्टर नुसरत परवीन यांचा हिजाब ओढल्याचा प्रकार घडल्यानंतर त्या बिहार सोडून आपल्या कुटुंबाकडे कोलकात्यात परत गेल्या आहेत. १५ डिसेंबर रोजी ही घटना घडली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी नुसरत परवीन यांनी बिहार सोडल्याची माहिती समोर आली आहे.
नुसरत परवीन या अभ्यासात हुशार असून डॉक्टर बनणे हे त्यांचे स्वप्न होते. मात्र, या घटनेनंतर त्या मानसिक धक्क्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या त्या बिहार सरकारची नोकरी जॉईन करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. कुटुंबीय त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असले तरी पुन्हा बिहारमध्ये परत येऊन नोकरी स्वीकारण्याचे धाडस त्या करू शकत नसल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेनंतर नुसरत यांनी सर्वप्रथम आपल्या भावाला फोन करून संपूर्ण प्रकार सांगितला होता. फोनवर बोलताना त्या भावूक झाल्या होत्या. भावाने त्यांना तत्काळ कोलकात्यात येण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्या दुसऱ्या दिवशी कोलकाता येथे दाखल झाल्या.
नुसरत परवीन म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांनी जे काही केले ते जाणूनबुजून होते असे मी म्हणत नाही. मात्र, जे घडले ते मला आवडले नाही. तिथे अनेक लोक उपस्थित होते. काहीजण हसत होते. एक मुलगी म्हणून मला तो प्रकार अपमानासारखा वाटला. त्या घटनेमुळे मला मानसिक त्रास झाला आहे.