जिल्हा पंचायत मतदानासाठी ४ हजार पोलीस तैनात

उत्तर गोव्यात १,६५२, तर दक्षिण गोव्यात १,८११ पोलीस


52 mins ago
जिल्हा पंचायत मतदानासाठी ४ हजार पोलीस तैनात

मतपेट्या निवडणूक आयोगाच्या कार्यालयात नेताना कर्मचारी.  (नारायण पिसुर्लेकर)

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात २० डिसेंबर रोजी ५० जिल्हा पंचायत मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलीस खात्याने चोख बंदोबस्त ठेवला आहे. यासाठी पोलीस खात्याने पोलीस स्थानक, वाहतूक विभाग, सुरक्षा विभाग व इतर विभागातील मिळून सुमारे ४००० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात केले आहेत.
दोन्ही जिल्ह्यात मिळून १,२३८ मतदान केंद्र आहेत. यातील उत्तर गोव्यात ६५८, तर दक्षिण गोव्यात ६२५ मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रासाठी तसेच निवडणुकीसाठी गोवा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. उत्तर गोव्यातील जिल्हा पंचायत मतदान केंद्रांसाठी क्षेत्रीय पोलीस अधिकारी, भरारी पथक, स्केटर अधिकारी म्हणून विविध सरकारी कर्मचाऱ्यांसह पोलीस कर्मचारी तैनात राहणार आहेत. याशिवाय मतदान केंद्रांवर, मतमोजणी व इतर ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
उत्तर गोव्यात एक अधीक्षक, पाच उपअधीक्षक, ३७ पोलीस निरीक्षक, ४८ उपनिरीक्षक, १७१ साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, २१२ पोलीस हवालदार, ८३२ कॉन्स्टेबल आणि ३४६ गृहरक्षक मिळून १,६५२ कर्मचारी तैनात केले आहेत. उत्तर गोव्यात भारतीय राखीव दलाचे (आयआरबी) दोन पुरुष आणि दोन महिला पलटून तैनात आहेत.
दक्षिण गोव्यातील मतदान केंद्रांवर एक पोलीस अधीक्षक, ५ उपअधीक्षक, १८ पोलीस निरीक्षक, ४६ उपनिरीक्षक, ४६ साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, २०० पोलीस हवालदार, १,२१० कॉन्स्टेबल आणि २८५ गृहरक्षक मिळून १,८११ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. भारतीय राखीव दलाचे (आयआरबी) दोन पुरुष आणि दोन महिला पलटून तैनात आहेत.
या व्यतिरिक्त गोवा पोलिसांचे वाहतूक पोलीस, दहशतवाद विरोधी पथक, बाॅम्ब निकामी पथक, जलद कृती दलाचे पोलीस, तसेच विशेष विभागाचे पोलीस कर्मचारी, असे सुरक्षा यंत्रणेसाठी सुमारे ८०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

जाहीर प्रचार सकाळी ८ वाजता संपणार

राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी सुरू असलेला जाहीर प्रचार गुरुवारी सकाळी ८ वा. अधिकृतपणे संपणार आहे. २० डिसेंबरला ५० मतदारसंघांत मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, मतदानाच्या ४८ तास आधी जाहीर प्रचार थांबवणे आवश्यक असते. त्यानंतर उमेदवार मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीवर भर देणार आहेत.

जिल्हा पंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्यात राजकीय पक्षांच्या व अपक्ष उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरू केला होता. जाहीर सभा, पदयात्रा, घराघरांत भेटी,  तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचे उमेदवारांनी प्रयत्न केले. 

गुरुवारी सकाळी ८ नंतर जाहीर प्रचार संपणार आहे. त्यानंतर उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते वैयक्तिक संपर्कावर भर देणार आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.

मतदानादिवशी भरपगारी सुट्टी

जिल्हा पंचायत निवडणुकीच्या मतदानादिवशी म्हणजे शनिवार, २० डिसेंबर रोजी सरकारने मतदान करणाऱ्या सर्व कामगारांसाठी भर पगारी सुट्टी जाहीर केली आहे. याबाबतची अधिसूचना सर्व साधारण प्रशासन खात्याने जारी केली आहे. ही सुट्टी राज्यातील सर्व व्यावसायिक व औद्योगिक आस्थापनांतील कामगार तसेच सरकारी खाती, औद्योगिक/व्यावसायिक आस्थापनांतील रोजंदारीवरील कामगारांना लागू असेल.