चारशे-पाचशेच्या फरकाने जिंकलेल्यांच्या मतदारसंघांतून हजारो मतांची झाली कपात

गणिते जमवण्यासाठी करावी लागणार कसरत : अनेक मतदारसंघात विजयी-प्रतिस्पर्धी उमेदवारांतील मतांच्या फरकापेक्षा वगळलेले मतदार दुप्पट


4 hours ago
चारशे-पाचशेच्या फरकाने जिंकलेल्यांच्या मतदारसंघांतून हजारो मतांची झाली कपात

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : निवडणूक आयोगाकडून एसआयआर पूर्ण झाल्यानंतर राज्यातील १ लाख ४२ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. विधानसभेच्या निवडणुका २०२७ मध्ये होणार आहेत. विद्यमान सभागृहातील काही सदस्य प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अगदी थोड्या मतांनी पराभव करून सभागृहात पोहोचले आहेत. असे ‘काठावर पास’ झालेल्या विद्यमान आमदारांना मतदारसंघातील वगळलेल्या मतदारांमुळे आगामी निवडणूक जड जाऊ शकते. यामुळे मतदारसंघातील समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून राज्यातील एसआयआर पूर्ण झाल्यानंतर उत्तर गोव्यातील ४४ हजार ६३९, तर दक्षिण गोव्यातील ५५ हजार ४०३, अशा एकूण १ लाख ४२ मतदारांची नावे मसुदा यादीतून वगळण्यात आली आहेत. मृत, दुहेरी नाव, अनुपस्थित, पत्ता कायमचा बदलला अशी कारणे असलेल्या मतदारांचा यात समावेश आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून कळवण्यात आले आहे. मागील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर नजर टाकली असता मतदार वगळल्याचा परिणाम राज्यातील किमान आठ-दहा मतदारसंघांतील निकालावर होऊ शकतो, असे दिसून येते.


२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत उत्तर गोव्यातील सान्तआंद्रे मतदारसंघात रिव्हॉल्युशनरी गोवन्स (आरजी) पक्षाचे वीरेश बोरकर विजयी झाले होते. त्यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार फ्रान्सिस सिल्वेरा यांचा अवघ्या ७६ मतांनी पराभव केला होता. एसआयआरनंतर सान्तआंद्रे मतदारसंघातून २,८९४ मतदार वगळले आहेत. डिचोली मतदारसंघात डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि नरेश सावळ यांच्यातील मतांचा फरक ३१८ होता. या मतदारसंघातून १,०७८ नावे वगळण्यात आली आहेत. साखळीतून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फक्त ६६६ मतांनी काँग्रेसचे उमेदवार धर्मेश सगलानी यांच्यावर विजय प्राप्त केला होता. एसआयआरनंतर साखळी मतदारसंघातून १,०७१ नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. पणजी मतदारसंघातून बाबूश मॉन्सेरात यांनी अवघ्या ७१६ मतांनी उत्पल पर्रीकर यांना पराभूत केले होते. एसआयआरनंतर पणजीतून ३,६३० नावे वगळण्यात आली आहेत. मांद्रेचे जीत आरोलकर यांनी भाजपचे दयानंद सोपटे यांच्यावर ७६५ मतांनी विजय नाेंदवला होता. या मतदारसंघातून आता १,०८२ नावे वगळण्यात आली आहेत.


दक्षिण गोव्यातील फोंडा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार कै. रवी नाईक यांनी मगोचे उमेदवार केतन भाटीकर यांच्यावर अवघ्या ७८ मतांची आघाडी घेतली होती. फोंडा मतदारसंघातून २,८८४ मतदारांना वगळण्यात आले आहे. वेळ्ळीतून ‘आप’चे क्रूझ सिल्वा आणि काँग्रेसचे सावियो डिसिल्वा यांच्यात फक्त १६९ मतांचा फरक होता. या मतदारसंघातील २,२५० नावे वगळण्यात आली आहेत. प्रियोळमधून भाजपचे गोविंद गावडे यांनी मगोच्या दीपक ढवळीकर यांच्यावर २१३ मतांनी मात केली होती. या मतदारसंघातून आता १,१३२ नावे वगळली आहेत. नावेलीत भाजपचे उल्हास तुयेकर आणि वालंका आलेमाव यांच्यात ४३० मतांचा फरक होता. एसआयआरनंतर येथील २,८८६ मतदारांची नावे वगळली आहेत. फातोर्डा मतदारसंघात विजय सरदेसाई आणि दामू नाईक यांच्यातील मतांचे अंतर १,५२७ होते. या मतदारसंघातून ४,०४० नावे वगळली आहेत. मुरगावमधून संकल्प आमोणकर यांनी मिलिंद नाईक यांचा १,९४१ मतांनी पराभव केला होता. एसआयआरनंतर या मतदारसंघातील ३,५३९ मतदारांची नावे वगळली आहेत. वास्को मतदारसंघातील सर्वाधिक ७,५३५ नावे मसुदा यादीतून वगळण्यात आली आहेत. २०२२ च्या निवडणुकीत दाजी साळकर यांनी कार्लुस आल्मेदा यांच्यावर ३,६५७ मतांनी विजय नोंदवला होता. या दोघांमधील मतांचे अंतर होते, त्याच्या दुपटीने मतदार पुढील निवडणुकीत कमी होऊ शकतात.
मतदार घटल्याने चुरस वाढणार
एसआयआरनंतर मतदारसंघातील मतदारांची संख्या कमी होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत याचा परिणाम निश्चित जाणवणार आहे. अनेक मतदारसंघांतील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. उमेदवारांना मते मिळवण्यासाठी वेगळी गणिते मांडावी लागणार आहेत. बदललेल्या स्थितीमुळे भविष्यातील निवडणुका अधिक चुरशीच्या होण्याची शक्यता आहे.