मॅपिंग न झालेल्यांनाही मतदानाचा हक्क

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे राज्यातील मतदारांची विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) पूर्ण झाली आहे. यानंतर एकूण १ लाख ४२ मतदारांची नावे मसुदा यादीतून वगळण्यात आली आहेत. या मतदारांचा एएसडीडी या श्रेणीत समावेश केला आहे. यातील मृत मतदार वगळता अन्य मतदारांचे नाव जिल्हा पंचायत मतदार यादीत असेल तर त्यांना मतदान करता येणार आहे. अशा मतदारांसाठी जिल्हा पंचायतीचे हे मतदान कदाचित शेवटचे ठरणार आहे.
एसआयआरनंतर एएसडीडी श्रेणीत मृत, अनुपस्थित, दुहेरी नाव असणे, पत्ता कायमचा बदलला अथवा अन्य कारणांचा समावेश आहे. मसुदा यादीत २५ हजार ५७४ मृत मतदारांचे नाव कमी करण्यात आले आहे. २९ हजार ७२९ अनुपस्थित मतदार आहेत. ४० हजार ४६९ मतदारांनी आपला पत्ता कायमचा बदलला आहे. १,९९७ दुहेरी मतदार आहेत, तर २,२७३ मतदारांनी एम्युरेशन फॉर्म भरून देण्यास नकार दिला आहे. ही मसुदा यादी असल्याने एएसडीडी मतदारांना हरकती नोंदवण्यासाठी कालावधी देण्यात आला आहे.
अंतिम यादी १४ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर केली जाणार आहे. याशिवाय एसआयआरनंतर एकूण १ लाख ८२ हजार ४०३ मतदारांचे मॅपिंग झालेले नाही. याचाच अर्थ या मतदारांचे अथवा त्यांच्या आई-वडिलांचे नाव २००२ च्या मतदार यादीत नव्हते. अशा मतदारांना आपल्या नागरिकत्वाचा पुरावा सादर करावा लागेल. यासाठी सुनावणी घेण्यात येणार आहे. यातील मतदारांचे नाव जिल्हा पंचायत मतदार यादीत असेल तर त्यांनादेखील २० रोजी होणाऱ्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार आहे.