केंद्रीय मंत्र्यांसह भाजप अध्यक्ष नड्डा यांची घेतली भेट

मडगाव : सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत (Goa PWD minister Digambar Kamat) यांनी दिल्लीत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav), केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान (Shivrajsing Chouhan) यांच्यासह भाजप अध्यक्ष व केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा (J P Nadda) यांची भेट घेतली. राज्यातील विकासकामांसंदर्भात या भेटी असल्याचे मंत्री कामत यांनी सांगितले.

मंत्री दिगंबर कामत यांची दिल्लीवारीची सध्या राज्यात चर्चा होत आहे. मंत्री कामत यांनी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब भेट घेतली होती. या भेटीनंतर कामत यांनी हा दिल्ली दौरा वैयक्तिक होता व पंतप्रधान मोदींशी कौटुंबिक भेट घेतल्याचे स्पष्ट केले होते. आता मंत्री कामत हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान सचिव व इतर अधिकारी यांच्यासह कॅप्टन ऑफ पोर्टच्या वरिष्ठ अधिकार्यांसह दिल्लीला गेले आहेत. या दौर्यात मंत्री कामत यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची मंगळवारी भेट घेतली, तर केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही भेट घेतली. यावेळी कामत यांचे पुत्र योगीराज कामत हे देखील उपस्थित होते.

मंत्री कामत यांच्या दिल्ली दौर्यामुळे राज्यातील चर्चांना ऊत आला आहे. मात्र मंत्री कामत यांनी हा दौरा सार्वजनिक बांधकाम खाते व कॅप्टन ऑफ पोर्टसच्या अधिकार्यांसह राज्यातील विकासकामांबाबत आहे. विविध केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन राज्यातील विकासकामांची प्रगती व त्यांच्यासाठी आवश्यक सहकार्यावर चर्चा करण्यात आल्याचे स्पष्ट केले.
