पणजी स्मार्ट सिटीतील ९२ टक्के प्रकल्प पूर्ण

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
34 mins ago
पणजी स्मार्ट सिटीतील ९२ टक्के प्रकल्प पूर्ण

पणजी : गोव्यात (Goa) स्मार्ट सिटी मिशन (Smart City Mission) अंतर्गत १ डिसेंबर २०२५ अखेरीस पणजीमधील (Panjim) ९२.१५ टक्के प्रकल्प पूर्ण झाले आहेत. तर पणजी वगळता देशातील अन्य स्मार्ट सिटीमधील ९६ टक्के प्रकल्प पूर्ण झाले आहेत. केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी कामकाज खात्याचे राज्यमंत्री तोखन साहू यांनी लोकसभेत (Loksabha) दिलेल्या लेखी उत्तराद्वारे ही माहिती मिळाली.  याविषयी खासदार सयानी घोष यांनी अतारांकित प्रश्न विचारला होता.

उत्तरानुसार, स्मार्ट सिटी अंतर्गत पणजीत एकूण ५१ प्रकल्प मंजूर करण्यात आले होते. यातील ४७ प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे. तर ४ प्रकल्पांचे काम सध्या सुरू आहे. या ५१ प्रकल्पांसाठी १०५१ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. पूर्ण झालेल्या ४७ प्रकल्पांसाठी १०१४ कोटी रुपये खर्च झाला. तर कामे सुरू असलेल्या ४ प्रकल्पांसाठी ३७ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. 

उत्तरात म्हटले आहे की, स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत देशभरातील १०० शहरात ८०६४ प्रकल्प मंजूर झाले होते. यासाठी एकूण १.६४ लाख कोटी रुपये मंजूर करण्यात आले. यातील १.५५ लाख कोटी रुपयांचे ७७४१ प्रकल्प पूर्ण झाले आहेत. तर सध्या ३२३ प्रकल्पांचे काम सुरू आहे. यासाठी ९४२५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. स्मार्ट सिटी मिशनला ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

शिल्लक कामे डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करा  

उत्तरात म्हटले आहे की, स्मार्ट सिटी मिशनची अंतिम मुदत ३१ मार्च, २०२५ पर्यंत होती. याबाबत खात्याने सर्व राज्य सरकारांना कळवले होते. यावेळी काही प्रकल्प अंमलबजावणीच्या विविध टप्प्यात होते. यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘स्पेशल पर्पज व्हेइकलला’ (एसपीव्ही) शिल्लक कामे डिसेंबर २०२५ पूर्वी पूर्ण करण्याची सूचना खात्यातर्फे देण्यात आली आहे.

हेही वाचा