जाहीर प्रचार संपला : ८,६९,३५६ मतदार करणार जिल्हा पंचायतीसाठी मतदान

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
जाहीर प्रचार संपला : ८,६९,३५६ मतदार करणार जिल्हा पंचायतीसाठी मतदान

पणजी : शनिवारी २० डिसेंबरला होणार असलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी (Zilla Panchayat Election) जाहीर प्रचार आज सकाळी ८ वाजता संपला. जिल्हा पंचायतीच्या एकूण ५० मतदारसंघांसाठी ८,६९,३५६ मतदार मतदान करणार आहेत. दोन्ही जिल्हा पंचायतीत पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे महिला मतदारांची मते निर्णायक ठरणार आहेत. सोमवारी २२ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. 

२०२७ साली विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याच्या पूर्वी एप्रिल, २०२६ पर्यंत फोंडा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. जिल्हा पंचायतीच्या निवडणूक निकालावर राजकीय पक्ष तसेच इच्छुक उमेदवार विधानसभा निवडणुकीसाठी रणनिती ठरवणार. त्यासाठी जिल्हा पंचायत निवडणुकीचे निकाल महत्वाचे ठरणार आहेत. उत्तर गोव्यात (North Goa) २५ मतदारसंघांसाठी ४,४०,१९९ मतदार आहेत. दक्षिण गोव्यात (South Goa) २५ मतदारसंघांसाठी ४,२९,१५७ आहेत.

उत्तर गोव्यात मतदानासाठी ६५८ तर दक्षिण गोव्यात मतदानासाठी ६२६ मतदान केंद्रे आहेत. मतपत्र‌िकेच्या आधारे होत असलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपसहीत विरोधी कॉंग्रेस, आप, आरजी या राजकीय पक्षानी जोरदार प्रचार केला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सहीत प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी गोवा पिंजून काढला आहे. मंत्री तसेच आमदारांनी आपआपल्या मतदारसंघांत प्रचाराकडे लक्ष केंद्रीत केले. आपाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल सोडल्यास इतर पक्षांचे राष्ट्रीय नेते प्रचाराला आले नाहीत. अरविंद केजरीवाल यांनी तीन दिस आप पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार केला. जाहीर प्रचार संपल्याने निवडणुकीतील उमेदवार आता व्यक्तीगत प्रचारावर भर देणार. 


हेही वाचा