१०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पणजी : आपल्या अंगभूत शिल्पकलेच्या आविष्काराला खडतर प्रयत्नांची जोड देत गगनाला भिडणारी शिल्पे, मूर्ती, पुतळे साकारत जगभरात भारताचे नाव उंचावणारे प्रख्यात शिल्पकार (sculptor artist), पद्मभूषण राम सुतार (Ram Vanji Sutar) यांचे निधन झाले. १०१ व्या वर्षी नोएडातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गोव्यातील (Goa) पर्तगाळी (Partgali) येथील श्री संस्थान गोकर्ण जीवोत्तम मठात (Shir Saunsthan Gokarn Jivottam Math) त्यांनी साकारलेल्या ७७ फूट उंच श्रीरामाच्या मूर्तीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते नुकतेच अनावरण करण्यात आले होते. त्यानंतर अवघ्याच काही दिवसांत त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुलगा अनिल सुतार यांनी श्रीरामाची मूर्ती साकारली होती.

अनेक अजरामर शिल्पे, पुतळे, मूर्त्या तयार करण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांनी तयार केलेली शिल्पे भारताबरोबरच विदेशातही पोचली आहेत. गुजरात येथे उभारण्यात आलेला ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ (सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा) त्यांनीच उभारला होता. संसद भवनातील छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासहीत अनेक जगप्रसिद्ध कलाकृती साकारल्या होत्या. महाराष्ट्र भूषण व पद्मश्री यांसारखे सन्मान मिळाले होते. ‘शिल्पकलेतील भीष्माचार्य’ अशी त्यांनी ओळख निर्माण केली होती. अनेक पुतळे त्यांनी तयार केले ते जगभरात पोचले. त्यांनी साकारलेले महात्मा गांधी यांचे पुतळे ४५० शहरांत बसविण्यात आले. त्यांच्या निधनाने कला क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

राम सुतार यांना १९९९ मध्ये भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१८ मध्ये पद्मभूषण हा देशातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला. गगनाला भिडणारी शिल्पे, मूर्ती साकारण्यात त्यांचा हातखंडा होता. अयोध्येतील भगवान श्रीराम आणि वीणा यांची २५१ मीटर उंचीची मूर्तीही त्यांनीच साकारली आहे. बंगळुरू येथील भगवान शिवाची १५३ फूटांची मूर्ती त्यांनी तयार केली. अलिकडेच पुण्यातील मोशी येथे उभारण्यात आलेला छत्रपती संभाजी महाराज १०० फूट उंच पुतळाही त्यांनी साकारला होता. गोव्यातील पर्तगाळ येथील श्री गोकर्ण जीवोत्तम मठाच्या ५५० व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद मोदी यांच्याहस्ते ७७ फूट उंच, कांस्य धातूच्या श्रीरामाच्या भव्य मूर्तीचे अनावरण करण्यात आले होते. शिल्पकार राम सुतार यांनीच ही मूर्ती घडवली होती. आशियातील सर्वात उंच श्रीरामाची मूर्ती असल्याचे मानले जात आहे. त्यांच्या निधनाने शिल्पकलेतील एक पर्व संपल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.
