जिल्हा पंचायतीसाठी उद्या मतदान; ८ लाख ६९ हजार ३५६ मतदार ठरविणार २२६ उमेदवारांचे भवितव्य


2 hours ago
जिल्हा पंचायतीसाठी उद्या मतदान; ८ लाख ६९ हजार ३५६ मतदार ठरविणार २२६ उमेदवारांचे भवितव्य

पणजी : उत्तर व दक्षिण गोवा (North and South Goa)  मिळून जिल्हा पंचायतीच्या (Zilla Panchayat) ५० मतदारसंघांसाठी उद्या शनिवार २० डिसेंबर रोजी मतदान होत आहे. मतपत्रिकेच्या आधारे सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होईल. दोन्ही जिल्हा पंचायतीत मिळून २२६ उमेदवार रिंगणात असून, मतदारांचा आकडा ८ लाख ६९ हजार ३५६ आहे. उत्तर गोव्यात (North Goa) १११ तर दक्षिण गोव्यात (South Goa) ११५ उमेदवार आहेत.

जाहीर प्रचार गुरूवारी सकाळी समाप्त झाल्यानंतर मतदानाच्या आदल्या दिवशी उमेदवारांनी मतदारांच्या व्यक्तीगत गाठीभेटी घेण्यावर भर दिला. प्रचारावेळी कुठेही वादावादी किंवा हिंसक घटना घडल्या नाहीत. शुक्रवारी मतदान केंद्रांवर मतपत्रिका तसेच इतर साहित्य पाठविण्याचे काम सुरू होते. कोणतीही अनुचित घटना घडू नये, म्हणून सर्व मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त असणार आहे. यावेळी बहुतांशी उमेदवार नवीन असल्याने निकालाचे अंदाज वर्तविणे कठीण झाले आहे. विद्यमान सदस्यांचे बहुतांशी मतदारसंघ महिलांसाठी किंवा इतर इतर मागास वर्गीयांसाठी राखीव झाल्याने विद्यमान सदस्यांना उमेदवारी सादर करता आली नाही. तरी सुद्धा ९ विद्यमान सदस्य निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच मागच्या वेळचे (२०२०) १२ उमेदवार यावेळी पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. 

भाजपने (BJP) ४० तर मगोने ३ मतदारसंघांत उमेदवार उभे केले आहेत. इतर ७ ठिकाणी अपक्षांना पाठिंबा दिला आहे. काँग्रेस (Congress), गोवा फॉरवर्ड (Goa Forward), आरजी (RG) व आपचे (Aap) उमेदवार रिंगणात असल्याने निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे. उद्या २० रोजी मतदान झाल्यानंतर सोमवार २२ रोजी मतमोजणी होईल. तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. 

उत्तर गोवा

मतदारसंघ : २५

मतदार : ४४०१९९

पुरूष : २१३७०४

महिला : २२६४९२

मतदानकेंद्रे : ६५८

एकूण उमेदवार : १११

दक्षिण गोवा 

मतदारसंघ : २५

मतदार : ४२९१५७

पुरूष : २०६९०२

महिला : २२२२५३

मतदानकेंद्रे : ६२६

एकूण उमेदवार : ११५







हेही वाचा