नाताळाच्या खरेदीला महागाईची झळ; किंमती भिडल्या गगनाला

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
43 mins ago
नाताळाच्या खरेदीला महागाईची झळ; किंमती भिडल्या गगनाला

पणजी : गोव्यात (Goa) सध्या नाताळ (Christmas) सणाची जोरदार तयारी सुरू आहे. बाजारपेठाही सजल्या आहेत. खरेदीसाठी गर्दी दिसत आहे. अनेक प्रकारचे जिन्नस, गोडधोड, मांसाहारी पदार्थ यांची या सणात रेलचेल असते. मात्र, महागाईची झळ बसत असल्याने खरेदी करताना खिशाला अधिक कात्री लागत असल्याचा सूर व्यक्त केला जात आहे. 

गोव्यातील स्थानिक बाजारपेठांमध्ये फिरल्यावर वाढत्या महागाईची चर्चा ऐकायला मिळत आहे. मांस (meat), चिकनच्या किंमती वाढल्या आहेत. गेल्या डिसेंबरच्या तुलनेत बॉयलर चिकनच्या (Broiler chicken) किमती जवळपास २० टक्के वाढल्या. मांसाच्या किमती वाढल्या त्याला मुख्य कारण म्हणजे वाहतूक खर्च व अनेकदा काही व्यापाऱ्यांचा संधीसाधूपणा असल्याचा सूर व्यक्त केला जात आहे. नाताळनि‌मित्त अनेक पदार्थ, मिठाई बनवण्यासाठी लागणारी अंडी १०० रुपये डझन झाली आहेत. नाताळचे पदार्थ तयार करण्यासाठी जास्त वापरली जाणारी गावठी अंडी २०० रुपयांपेक्षा जास्त किंमतीत विकली जात आहेत. म्हणजेच किंमत दुप्पट झाली आहे. 

दरम्यान, नाताळ आणखी जवळ येताच किमती आणखी वाढल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गोव्यातील पाककृती आणि नाताळची मिठाई, गोडधोड पदार्थ करण्यात वापरला जाणारा नारळही महागला आहे. गेल्या वर्षी २५ ते ३० रुपयांना नारळ मिळत होता. मात्र, आता गुणवत्ता आणि आकारानुसार त्याची किंमत ५० रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. नाताळची मिठाई व स्वयंपाक बनवण्यासाठी बरेच नारळ लागतात. नारळ महागल्याने जास्त पैसे मोजावे लागत आहेत.

गोव्यात नारळ आता ‘लक्झरी’ वस्तू बनत चालल्याच्या प्रतिक्रिया विनोदाने व्यक्त केल्या जात आहेत. दोसे, दोदोल, बेबिंका, करंज्या यांसारखे पारंपारिक खाद्यपदार्थ बनवण्यासाठी अंडी, साखर, मैदा व नारळांची आवश्यकता असते. मात्र, महागाई वाढल्याने खाद्यपदार्थ बनवावे कसे, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. वाढत्या महागाईत खर्चाला कात्री लावण्याशिवाय पर्याय नसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.  


हेही वाचा