अपुऱ्या झोपेमुळे हृदयविकाराचा धोका ४५ टक्क्यांनी वाढतो; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

मुंबई: आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत कामाचा वाढता व्याप, नोकरीतील स्पर्धा आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे मानवी आयुष्यातील झोपेचे महत्त्व कमालीचे घटले आहे. अनेकजण रात्री उशिरापर्यंत मोबाईल स्क्रोल करण्यात किंवा कामात मग्न असतात आणि केवळ सहा तास किंवा त्यापेक्षा कमी झोप घेतात. मात्र, आहारतज्ज्ञ आनंद पंजाबी आणि आरोग्य क्षेत्रातील अभ्यासानुसार, ही सवय तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. अपुऱ्या झोपेचा थेट परिणाम तुमच्या वजनावर आणि हृदयावर होत असून, यामुळे मृत्यूचा धोकाही संभवतो.

अपुऱ्या झोपेमुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते, ज्याचा थेट संबंध वजनाशी असतो. जेव्हा आपण पुरेशी झोप घेत नाही, तेव्हा भुकेवर नियंत्रण ठेवणारे ‘घ्रेलिन’ नावाचे हार्मोन वाढते, ज्यामुळे वारंवार खाण्याची इच्छा होते. दुसरीकडे, पोट भरल्याचा संकेत देणारे ‘लॅप्टिन’ हार्मोन कमी झाल्यामुळे जेवणानंतरही समाधान मिळत नाही आणि गरजेपेक्षा जास्त खाल्ले जाते. इतकेच नव्हे तर, झोप पूर्ण न झाल्यामुळे शरीरात ‘कोर्टिसोल’ या स्ट्रेस हार्मोनची पातळी वाढते, ज्यामुळे पोटाभोवती चरबी जमा होऊन स्थूलपणा वाढतो. अपुऱ्या झोपेमुळे इन्शुलिनच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होतो, परिणामी शरीरातील साखरेचा वापर योग्य प्रकारे होत नाही आणि मधुमेहाचा धोका वाढतो.

झोपेचा अभाव केवळ लठ्ठपणापुरता मर्यादित नसून तो हृदयासाठी अत्यंत जीवघेणा ठरू शकतो. एका संशोधनानुसार, अपुरी झोप घेणाऱ्या व्यक्तींमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता ४५ टक्क्यांनी अधिक असते. झोप पूर्ण न झाल्यामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयाची गती अनियंत्रित होते. सततच्या तणावामुळे रक्तवाहिन्यांमध्ये सूज येऊन रक्ताच्या गाठी होण्याचा धोका निर्माण होतो, ज्याचे रूपांतर अखेर हार्ट फेल्युअरमध्ये होऊ शकते. शारीरिक परिणामांसोबतच मानसिक स्वास्थ्यावरही याचे गंभीर पडसाद उमटतात. अपुऱ्या झोपेमुळे चिडचिड वाढणे, एकाग्रतेचा अभाव, स्मृतीभ्रंश आणि नैराश्यासारखे विकार बळावतात. थकवा जाणवू लागल्यामुळे शरीराला जंक फूड किंवा तळलेले पदार्थ खाण्याची ओढ लागते, जे आरोग्यासाठी अधिकच नुकसानकारक ठरते.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, निरोगी आयुष्यासाठी वयोगटानुसार पुरेशी झोप घेणे अनिवार्य आहे. १८ ते ६४ वर्षे वयोगटातील प्रौढ व्यक्तींसाठी दररोज ७ ते ९ तासांची शांत झोप आवश्यक असते. लहान मुलांच्या बाबतीत हे प्रमाण १० ते १७ तासांपर्यंत असते. चांगली झोप मिळवण्यासाठी झोपण्यापूर्वी किमान एक तास आधी मोबाईल, टीव्ही आणि लॅपटॉप यांसारख्या उपकरणांपासून दूर राहणे आवश्यक आहे. झोपेचे एक ठराविक वेळापत्रक पाळणे, ध्यानधारणा करणे किंवा मनात विचारांची गर्दी असल्यास डायरी लिहिणे यांसारख्या सवयी लावून घेतल्यास शांत झोप लागण्यास मदत होते. लक्षात ठेवा, पुरेशी झोप हा केवळ विश्रांतीचा भाग नसून तो सुदृढ आरोग्याचा पाया आहे. त्यामुळे झोपेकडे दुर्लक्ष करणे म्हणजे स्वतःच्या हाताने आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे.