तर काश्मीरमध्ये रॅटल हायड्रो प्रकल्पात काम करणाऱ्या कामगारांचे दहशतवाद्यांशी साटेलोटे.

नवी दिल्ली/श्रीनगर: भारताच्या सीमावर्ती राज्यांमध्ये कार्यरत सुरक्षा यंत्रणांनी अत्यंत खळबळजनक माहिती उघड केली आहे. एका बाजूला अरुणाचल प्रदेशात पाकिस्तानशी संबंधित हेरगिरीचे मोठे जाळे उघडकीस आले असतानाच, दुसऱ्या बाजूला जम्मू-काश्मीरमधील महत्त्वपूर्ण 'रॅटल हायड्रो इलेक्ट्रिक' प्रकल्पावर काम करणाऱ्या २९ कामगारांचे थेट दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे समोर आले आहे. या दोन्ही घटनांमुळे देशाच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत.

अरुणाचलमध्ये 'हायब्रिड वॉरफेअर'चे सावट अरुणाचल प्रदेशात गेल्या १० दिवसांत पोलिसांनी पाकिस्तानशी संबंधित हेरगिरी करणाऱ्या चार संशयितांना अटक केली आहे. हे संशयित प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील (LAC) लष्करी कारवाया आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानी हँडलर्सना पुरवत होते. प्राथमिक तपासात या नेटवर्कचे धागेदोरे चीनशी जोडले गेल्याचेही समोर आले आहे. सुरक्षा तज्ज्ञांनी याला हायब्रिड वॉरफेअर म्हटले असून, हेरगिरी आणि घुसखोरीच्या माध्यमातून भारतावर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. राज्याचे गृहमंत्री मामा नाटुंग यांनी या प्रकरणातील गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

काश्मीरमधील रॅटल हायड्रो प्रकल्पाला अंतर्गत धोका चिनाब नदीवर बांधला जात असलेला ८५० मेगावॅटचा 'रॅटल हायड्रो प्रकल्प' आता दहशतवाद्यांच्या सावटाखाली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी केलेल्या पडताळणीत प्रकल्पावर काम करणाऱ्या २९ कामगारांची पार्श्वभूमी संशयास्पद आढळली आहे. यातील पाच जण सक्रिय किंवा आत्मसमर्पण केलेल्या दहशतवाद्यांचे जवळचे नातेवाईक आहेत. विशेष म्हणजे, हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी मोहम्मद अमीन याचा पुतण्या आणि दोन भाऊ याच प्रकल्पावर काम करत असल्याचे उघड झाले आहे. उर्वरित २४ कामगारांविरुद्ध विविध गुन्हेगारी गुन्हे नोंदवलेले आहेत.

सुरक्षा यंत्रणा आणि कंपनीमध्ये संघर्ष किश्तवाडचे एसएसपी नरेश सिंह यांनी प्रकल्पाचे काम करणाऱ्या 'मेघा इंजिनिअरिंग'ला पत्र लिहून या कामगारांच्या नियुक्तीवर पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. हा ३,७०० कोटी रुपयांचा प्रकल्प राष्ट्रीय महत्त्वाचा असून शत्रू राष्ट्रांच्या निशाण्यावर असल्याचे पोलिसांनी बजावले आहे. मात्र, कंपनीने हे कामगार प्रत्यक्ष दहशतवादी नसल्याचा दावा करत त्यांना तडकाफडकी कामावरून काढून टाकण्यास असमर्थता दर्शवली आहे. या कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर कडक लक्ष ठेवण्याचे आश्वासन कंपनीने दिले असले, तरी सुरक्षा यंत्रणांसाठी हा मोठा चिंतेचा विषय बनला आहे.