महिलांवरही अमानुष हल्ले

ढाका/मुंबई: बांगलादेशातील तरुण नेता शरीफ उस्मान हादी याच्या हत्येनंतर संपूर्ण देशात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले असून, परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे चित्र दिसत आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर, हिजाब न घातल्यामुळे आणि पाश्चिमात्य पोशाख परिधान केल्यामुळे महिलांवर अमानुष हल्ले होत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्याने बांगलादेशातील महिलांच्या सुरक्षेबाबत आता जागतिक स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे.
'इन्किलाब मंच' या संघटनेचा प्रमुख आणि २०२४ च्या विद्यार्थी आंदोलनातील एक महत्त्वाचा चेहरा असलेला शरीफ उस्मान हादी याची १२ डिसेंबर रोजी ढाका येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सिंगापूरमध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्यानंतर बांगलादेशात हिंसाचाराचा वणवा पेटला. संतप्त आंदोलकांनी ढाकासह इतर प्रमुख शहरांमध्ये तोडफोड आणि जाळपोळ केली. या गोंधळाचा फायदा घेत काही ठिकाणी धर्मांध टोळ्यांनी महिलांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या दाव्यांनुसार, पाश्चिमात्य कपडे घातल्यामुळे एका ख्रिश्चन महिलेला जमावाने भररस्त्यात मारहाण केली. तर अन्य एका घटनेत, बुरखा किंवा हिजाब परिधान न केल्यामुळे दोन मुस्लिम महिलांवरही हल्ला करण्यात आला. या घटनांची अधिकृत पुष्टी अद्याप सुरक्षा यंत्रणांकडून देण्यात आलेली नसली तरी, या व्हिडिओंनी जनमानसात प्रचंड भीती निर्माण केली आहे. यामुळे महिलांचे धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांचे उघड उल्लंघन होत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बांगलादेशच्या अंतरिम सरकारने विशेष मोहीम सुरू केली आहे. उस्मान हादी याची हत्या हा एक पूर्वनियोजित कट असल्याचे सरकारने म्हटले असून, हल्लेखोरांची माहिती देणाऱ्यास रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. अनेक शहरांत पोलीस आणि निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. असे असूनही, कट्टरतावादी गटांकडून महिलांना लक्ष्य केले जात असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मानवाधिकार संघटनांनी या हिंसाचाराचा निषेध केला असून, सामान्य नागरिकांच्या संरक्षणासाठी तातडीने कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे.