दंगेखोरपणा, अनियंत्रित गर्दीमुळे निर्णय

बेळगाव : गोवा सीमेवरील प्रसिद्ध वज्रपोहा धबधब्यावर वाढत्या दंगेखोरपणा आणि अनियंत्रित गर्दीच्या घटनांमुळे कर्नाटक प्रशासनाने धबधब्यावर प्रवेशबंदी लागू केली आहे.
म्हादई नदीवरून गोवा हद्दीत कोसळणारा हा निसर्गरम्य व मनोहारी धबधबा सुर्ला मार्गे पाहण्यासाठी पर्यटक येतात. विशेषतः पावसाळ्यात बेळगाव, गोवा व आसपासच्या भागातून मोठ्या प्रमाणात युवक व पर्यटक येथे गर्दी करीत असल्याने धबधब्याच्या माथ्यावरील प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
वन्यजीवांना होणारा त्रास आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटकचे वन, पर्यावरण व पर्यावरणीय समतोल मंत्री ईश्वर बी. खांड्रे यांनी शनिवारी सुवर्ण विधानसौध येथे बेळगाव वन वर्तुळातील वन अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत यासंबंधी आदेश जारी केले.
अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना माहिती दिली की, शनिवार-रविवार व सुट्ट्यांच्या दिवशी वज्रपोहा धबधब्यावर होणारी वाढती गर्दी, विशेषतः युवकांकडून होणारा दंगेखोरपणा, संवेदनशील वनक्षेत्रात मानवी हस्तक्षेप वाढवत आहे. यामुळे वन्यजीवांचा त्रास तसेच अपघातांचा धोका निर्माण झाला असून याबाबत तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत. या बाबींची दखल घेत खांड्रे यांनी प्रवेशावर कठोर नियंत्रण ठेवण्याचे व कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कडक देखरेख ठेवण्याचे निर्देश दिले.