गिलला वगळले, ईशान किशनचे पुनरागमन

मुंबई : आगामी टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारतीय संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. शनिवारी मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या उपस्थितीत संघ जाहीर करण्यात आला.
या विश्वचषकासाठी सूर्यकुमार यादव याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, अक्षर पटेलची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, स्टार फलंदाज शुभमन गिलला संघातून वगळण्यात आले आहे, तर ईशान किशन आणि रिंकू सिंह यांचे संघात पुनरागमन झाले आहे.
संघ निवडीबाबत बोलताना मुख्य निवडकर्ता अजित आगरकर म्हणाले, शुभमन गिल सध्या धावा करण्यासाठी संघर्ष करत आहे. त्याने गेल्या टी-२० विश्वचषकातही सहभाग घेतला नव्हता. सध्याच्या फॉर्मचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय चर्चेचा विषय ठरत असून, भविष्यातील मालिकांमध्ये गिलच्या पुनरागमनाची शक्यता खुली ठेवण्यात आली आहे.
या संघात ईशान किशन आणि संजू सॅमसन या दोघांनाही यष्टीरक्षक म्हणून स्थान देण्यात आले आहे. तर रिंकू सिंह मधल्या फळीतील फलंदाज आणि फिनिशरच्या भूमिकेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे मत क्रिकेट तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
भारतीय संघ विश्वचषकाच्या तयारीसाठी ११ जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध ३ एकदिवसीय सामने ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही मालिका विश्वचषकापूर्वी संघाची चाचणी घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
टी-२० विश्वचषकाची सुरुवात ७ फेब्रुवारी २०२६ रोजी कोलंबो येथे पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यातील सामन्याने होणार आहे. त्याच दिवशी भारत आपला पहिला सामना वानखेडे स्टेडियमवर यूएईविरुद्ध खेळेल. अंतिम सामना ८ मार्च २०२६ रोजी होणार आहे.
भारताला गट ‘अ’ मध्ये स्थान देण्यात आले आहे. या गटात भारतासह पाकिस्तान, अमेरिका, नामिबिया आणि नेदरलँड्स हे संघ आहेत.
भारतीय संघाचे गट सामने पुढीलप्रमाणे:
७ फेब्रुवारी: भारत वि. अमेरिका : मुंबई
१२ फेब्रुवारी: भारत वि. नामिबिया : दिल्ली
१५ फेब्रुवारी: भारत वि. पाकिस्तान : कोलंबो
१८ फेब्रुवारी: भारत वि. नेदरलँड्स : अहमदाबाद
टी-२० विश्वचषक आणि न्यूझीलंडविरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, ईशान किशन, हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग
भारत गतविजेता
भारतीय संघ गत टी-२० विश्वविजेता आहे. २९ जून २०२४ रोजी बार्बाडोस येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे २०२६ च्या विश्वचषकात भारताकडून पुन्हा एकदा दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.
भारत–न्यूझीलंड टी-२० मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक
सामना तारीख स्थळ
पहिला टी-२० २१ जानेवारी विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर
दुसरा टी-२० २३ जानेवारी शहीद वीर नारायण सिंग स्टेडियम, रायपूर
तिसरा टी-२० २५ जानेवारी बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी
चौथा टी-२० २८ जानेवारी डॉ. वाय.एस.आर. रेड्डी स्टेडियम, विशाखापट्टणम
पाचवा टी-२० ३१ जानेवारी ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम, तिरुवनंतपुरम